मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची चौथी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार ९५६ जागांसाठी १४ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७ हजार ७४१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर चौथ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच ४ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ५५३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ३७८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले. तसेच सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची चौथी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही.

चौथ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

हेही वाचा >>>बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प,विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची विक्री ?

चौथ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयात कला शाखेच्या २१ हजार ५१७ जागा उपलब्ध असून ६०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. तसेच वाणिज्य शाखेच्या ५६ हजार ५८२ जागा उपलब्ध असून ४ हजार ५८४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. विज्ञान शाखेच्या ३१ हजार ८१७ जागा उपलब्ध असून २ हजार ४१४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तसेच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी २ हजार ४० जागा उपलब्ध असून १३५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले.