वरळी ते शिवडी दरम्यान प्रस्तावित असलेल्या ४.२५ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाच्या बांधकामात पाच कंपन्यांनी रस दाखवला आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या कामातून कंपन्यांनी माघार घेतल्याने हताश झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
शिवडी-वरळी उन्नत मार्ग  वरळी येथे सुरू होईल आणि एलफिन्स्टन रोड, परळ, वडाळा माग्रे तो शिवडीला येऊन संपेल. तो चौपदरी असेल. त्यामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू या दोन प्रकल्पांमधील तो अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. ‘एमएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर ‘गॅमन इंडिया लि.’, ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’, ‘लार्सन अँड टुब्रो लि.’, ‘एन. सी. सी. लि.’ आणि ‘सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपन्यांनी वरळी-शिवडी उन्नत मार्ग बांधण्यात रस घेतला आहे.
पश्चिम उपनगरांतील वाहनधारकांना वांद्रय़ाहून सागरीसेतूने वरळीपर्यंत आल्यावर हा उन्नत मार्ग वापरून थेट शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचा वापर करता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर रोज सुमारे २० हजार वाहनांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. आता या पाच कंपन्यांच्या प्रस्तावांची छाननी होईल आणि मूल्यमापनानंतर प्रकल्पाचे काम एका कंपनीला देण्यात येईल. काम सुरू झाल्यानंतर चार वर्षांत हा उन्नत मार्ग बांधून तयार होण्याची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा