लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : परदेशात फिरण्यासाठी जात असलेल्या एका व्यावसायिकाची एका पर्यटन कंपनीने साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी पर्यटन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुलुंड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने डिसेंबर २०२३ मध्ये न्यूझीलंड येथे फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला होता. एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी दहिसर येथील एका पर्यटन कंपनीची माहिती घेतली. त्या कंपनीशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ सर्व माहिती दिली. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे साडेपाच लाख रुपये भरले होते.

आणखी वाचा-मुंबई : पालिकेच्या सुरक्षा दलातील १९८४ रिक्त पदांमुळे कार्यरत सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण, पदे तात्काळ भरण्याची म्युनिसिपल युनियनची मागणी

डिसेंबरमध्ये त्यांची सहल निघणार होती. मात्र अचानक काही जणांनी नकार दिल्याचे सांगत कंपनीने सहल रद्द केली. काही दिवसात पुन्हा तारीख देण्यात येईल अशी माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतर देखील त्यांना पुढील तारीख सांगण्यात आली नाही. शिवाय कंपनीने त्यांच्याशी पुन्हा संपर्कही साधला नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीत जाऊन पैसे परत करण्याची विनंती केली. त्यानुसार कंपनीकडून त्यांना धनादेश देण्यात आले. मात्र दोन वेळा त्यांना देण्यात आलेले धनादेश रद्द झाले. अखेर त्यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.