मुंबई : पश्चिम रेल्वेवरून प्रवास करताना अनेक प्रवासी मौल्यवान वस्तू, त्याचे साहित्य रेल्वे स्थानक, रेल्वेगाड्यांमध्ये विसरुन जातात. हे साहित्य कोणत्याही चोरट्याच्या हाती लागण्याच्या आधीच आरपीएफच्या कर्मचाऱ्यांद्वारे साहित्य ताब्यात घेऊन, प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना परत केले जाते ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ही मोहीम सुरू असून जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यात पाच कोटी रुपयांचे साहित्य आरपीएफने प्रवाशांच्या स्वाधीन केले आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन मोहिमा राबवते. प्रवाशांच्या साहित्याची सुरक्षितता करण्यासाठी आरपीएफ द्वारे ‘ऑपरेशन अमानत’ राबवण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात पाच कोटींहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू, साहित्य प्रवाशांना परत केले आहे. तसेच चोरी झालेल्या रेल्वे मालमत्तेची वसुली ९० टक्के आहे. यासह गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दलालांवर कारवाई करणे, हरवलेल्या बालकांचा शोध घेणे अशा मोहिमा राबवण्यात आल्या. ‘ऑपरेशन जीवनरक्षा’ अंतर्गत रेल्वे रूळांवर आत्महत्या करणाऱ्या, लोकलमधून पडून रेल्वे रूळावर पडणाऱ्या १८ प्रवाशांचे प्राण सतर्क आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून बचावण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ३७८ मुलांचा शोध घेऊन, त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिकीट दलालांद्वारे बेकायदेशीरपणे आरक्षित केलेली २ कोटी रुपयांहून अधिक किमतीची प्रवासी तिकीट आरपीएफने जप्त केली असून ३७२ दलालांना अटक केली आहे.