मुंबई : मुंबईमध्ये गोवरमुळे सोमवारी आणखी एका पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे गोवरने झालेल्या मृतांची संख्या १५ झाली असून यामध्ये मुंबईतील १२ जणांचा समावेश आहे. तसेच मुंबईमध्ये मंगळवारी गोवरचे पाच रुग्ण सापडले असून, गोवरच्या रुग्णांची संख्या ३०८ झाली आहे. त्याचप्रमाणे ११८ संशयित रुग्ण सापडले असून, मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या ४ हजार १८० इतकी झाली आहे.
वडाळा येथील पाच महिन्याच्या मुलाचा गोवरनेमृत्यू झाला. या मुलाला ११ नोव्हेंबर रोजी खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. २३ नोव्हेंबर रोजी त्याला ताप आला, तर २४ नोव्हेंबरला त्याच्या अंगावर पुरळ उठले. २६ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याला डोळे आल्याचे निदर्शनास आले. २७ नोव्हेंबर रोजी त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागला, तर २८ नोव्हेंबरला त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. मुंबईत सापडलेल्या गोवर रुग्णांपैकी ४३ जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर २९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
महापालिकेकडे उपलब्ध लससाठा
मुंबई महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून, महापालिकेकडे एमआर लसीचा ५५ हजार २८०, तर एमएमआरचा २८ हजार ३५१ लससाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना देण्यात येणाऱ्या जीवनसत्त्वाच्या मात्रांसाठी १५ हजार ६८७ सिरप तर रेड सॉफ्टटय़ूल्स या ६९ हजार ५८५ इतके युनिट महापालिकेकडे उपलब्ध आहेत.