डोंबिवली एमआयडीसीतील ५० अनधिकृत बांधकामे शुक्रवारी सकाळपासून एमआयडीसीच्या अनधिकृत बांधकाम पथकाने जमीनदोस्त केली.  या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
  विशेष म्हणजे एमआयडीसी कार्यालयासमोरील विठ्ठल कामत हॉटेलसमोरचे अतिक्रमण तोडून टाकण्यात आले. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संरक्षित भिंतीला खेटून उभारण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
बँकेच्या परिसरातील सर्व अनधिकृत टपऱ्या, गाळे, गॅरेज जमीनदोस्त करण्यात आल्याने भूमाफियांनी अतिक्रमण केलेला भूखंड मोकळा झाला आहे.
हा भूखंड बाग, उद्यान विकसित करण्यासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँकेला द्यावा, अशी मागणी बँकेतर्फे एमआयडीसीला करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत. ही बांधकामे तोडण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून बँकेचे संचालक प्रा. उदय कर्वे, उदय पेंडसे एमआयडीसीकडे पाठपुरावा करीत होते.
कार्यकारी अभियंता नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी एकही भूमाफिया बांधकामे तोडकाम रोखण्यासाठी पुढे आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण पालिका थंड
एमआयडीसीने धडक कारवाई करून ५० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. मग कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना हात का थरथरत आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
महापालिका हद्दीतील भूमाफियांबरोबर पालिका अधिकाऱ्यांचे असलेले स्नेहाचे संबंध यानिमित्ताने जनतेसमोर उघड झाले आहेत. याउलट धोकादायक इमारती पावसाळ्यात तोंडावर पाडून रहिवासी, गाळेधारकांना बेघर करण्याचे काम पालिकेच्या ह प्रभागात सुरू असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही विकासकांच्या सुपाऱ्या घेऊन ही बांधकामे तोडण्यात येत असल्याची टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 unauthorized works demolish in dombivali midc
Show comments