मुंबई : कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक दबाव, आर्थिक परिस्थिती बिकट असणे, ग्रामीण भागात अपुऱ्या सोयीसुविधा आदी विविध कारणांमुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना तारेवरची कसरतही करावी लागते. परंतु मनात शिकण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही दहावीची परीक्षा उत्तीर्ण होता येते, हे अनेक महिलांनी दाखवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा येऊ पाहणाऱ्या सर्व महिलांच्या स्वप्नांना बळ हे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन देत आहे. ‘सेकंड चान्स’ हा उपक्रम राबवित या संस्थेने दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या शेकडो महिलांचा अभ्यास करून घेतला. त्यांच्यासाठी शिकवणीचे विशेष वर्ग राबविले. यंदा या उपक्रमात ७३५ जणांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हाच उपक्रम नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘नई किरण’ या नावाने सुद्धा चालवला जातो. सौम्या शर्मा या नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला गेला. यंदा नई किरण या उपक्रमात ६१९ महिला सहभाग झाल्या होत्या. त्यापैकी ५५० महिला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

आणखी वाचा-मुंबई : दुप्पट फायद्याच्या नावाखाली दिग्दर्शकाची दीड कोटींची फसवणूक

नागपूरमधील रामटेक शहरातील ६३ वर्षीय तुळसा धुर्वे या आजी अंगणवाडी सेविका आहेत. हसापुर या गावात त्यांचे बालपण गेले. परंतु त्या गावात जवळपास शाळा नसल्यामुळे त्यांचे शिक्षण हे आठवीपर्यंतच झाले. लहानपणी त्या तब्बल ४ किलोमीटर पायी चालत शाळेत जायच्या. वाहतुकीचीही व्यवस्थित सोय नव्हती. परंतु शिकण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच होती, अखेर त्यांनी यंदा दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि ६५ टक्के मिळवत यशस्वीरीत्या उत्तीर्णही झाल्या. गावात असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके वाचून त्यांनी अभ्यास केला. सातत्याने पुस्तके वाचली. दहावीनंतरही तुळसा धुर्वे यांना शिकण्याचा ध्यास असून अकरावी व बारावीची परीक्षा देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना ४ मुले असून ३ मुलांचे लग्न झाले आहे. घरातील मुले ही शेती व्यवसाय करतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील विहिरगाव येथील ५४ वर्षीय आशा गेडाम यांना घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. त्यांची बागायती शेतीही होती. त्यांनी सहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून जेव्हा सातवीत प्रवेश घेतला, तेव्हा त्यांचे वडील हे आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे वडील आजारी पडल्यानंतर घरातील जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांना शाळा ही सातवीला असतानाच सोडावी लागली. त्यांना ३ मुलगे व १ मुलगी आहे, मी नाही शिकली, तरी माझी मुले शिकतील हा आत्मविश्वास आशा गेडाम यांना होता. या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मुलांना उत्तम शिक्षण दिले. या सगळ्यात त्यांचीही शिकण्याची इच्छा त्यांना मनोमन सतावत होती आणि मुलांनी उत्तम शिक्षण घेतल्यानंतर आता आपली वेळ आहे, असे समजून त्यांनी ४० वर्षांच्या खंडानंतर दहावीची परीक्षा दिली आणि ४६.२० टक्के मिळवून यशस्विरित्या उत्तीर्णही झाल्या. आशा गेडाम या दररोज शेतीवर जाण्यासह बचत गटाचे काम सांभाळत दहावीचा अभ्यास केला. या प्रवासात त्यांना कुटुंबाने मोलाचे सहकार्य केले. त्यांनाही आता बारावीची परीक्षा देण्याची इच्छा आहे. बिकट परिस्थिती सर्वांवर येते. पण त्यावर मात करून पुढे जात रहावे, असे आशा गेडाम सांगतात.

आणखी वाचा-मुंबईत स्त्रियांसाठी पुरेशी शौचालये नाहीत, ४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुप महिलांसाठी

सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर गावात राहणाऱ्या ५८ वर्षीय गृहिणी कांता बागल यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या चार ते पाच किलोमीटरची पायपीट करत शाळेत जायच्या. परंतु पुढील शिक्षणासाठी मुलींना खेडेगावातून शहरात किंवा दूरवर असलेल्या गावात पाठवायला पूर्वी विरोध व्हायचा आणि चर्चाही व्हायची. त्यामुळे त्यांना शिक्षणही अर्ध्यावरच थांबबावे लागले. काही वर्षांनंतर त्यांचे लग्न झाले आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असूनही त्यांना शिकता आले नाही. परंतु ४४ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला. बाराखडीपासून वाचन व लेखनाचा त्यांनी मन लावून सराव केला. गणिताचाही त्यांनी विशेष अभ्यास केला. या प्रवासात त्यांचे कुटुंब हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्या ४४ टक्के मिळवून त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्याला शिकण्याची इच्छा असेल तर आपले वय आड येत नाही. आपण मेहनतीने, नित्यनेमाने अभ्यास करावा आणि परीक्षेला सामोरे जावे, असे कांता बागल यांनी सांगितले.

‘विविध कारणास्तव दहावीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देतो. जर महिला शिकल्या तर घरात शैक्षणिक वातावरण निर्माण होईल आणि त्याचा फायदा मुलांनाही होईल’ , असे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सोमनाथ गिरटकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 year old women excelled in class 10 exams mumbai print news mrj
Show comments