सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिरांमध्ये भाविकांची गैरसोय
केंद्र सरकारच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून वगळण्याचा निर्णयामुळे मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रशासनांनीही भाविकांकडून या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गरसोय होत आहे. सिद्धिविनायक, महालक्ष्मी व मुंबादेवी मंदिर प्रशासन अभिषेकासाठी आकारल्या जाणाऱ्या देणगीरुपी अभिषेकासाठी ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देत आहेत.
सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर प्रशासनाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून अभिषेकासाठी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा भक्तांकडून घेणे बंद केले आहे. सिद्धिविनायक मंदिरात ५ ते ५१ हजारापर्यंतची रक्कम अभिषेकासाठी आकारली जाते. तर महालक्ष्मी मंदिरात निव्वळ ३०-३५ रुपयांत भक्तांना अभिषेक करण्याची सोय आहे. मुंबादेवी मंदिरात ५१ रुपये आकारून अभिषेक करता येतो. मंदिर व्यवस्थापनाने अभिषेक सुरु ठेवले असले तरी त्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा भक्तांकडून घेणे बंद केले आहे. भाविकांकडे सुटय़ा पैशांची मागणी होत आहे. महालक्ष्मी मंदिरात मुळातच अधिषेकासाठी आकारण्यात येणारी रक्कम दोन आकडी असल्याने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही. तरी कोण्या भक्तांने या नोटा देऊ केल्या तर मंदिर प्रशासन त्या स्विकारणार नाही, असे महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक शरद पाध्ये यांनी सांगितले.
सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने देणगी आणि अभिषेकासाठी भक्तांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकारणे बंद केले आहे. मात्र दानपेटीत भक्त पाचशे आणि हजाराच्या नोटा टाकू शकतात. त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन आणि नियंत्रण मंदिर प्रशासनाकडून घातण्यात आलेले नाही.
– संजीव पाटील, कार्यकारी अधिकारी– सिद्धिविनायक मंदिर
केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना मुंबादेवी मंदिर प्रशासनही भक्तांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्विकारणार नाही.
– हेमंत जाधव, व्यवस्थापक, मुंबादेवी मंदिर