पाचशे-हजाराच्या नोटांना चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाविकांनी देवाच्या चरणी या नोटा वाहण्यास सुरूवात केली आहे. खासकरून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत या नोटा पडण्याचे प्रमाण तब्बल २५ ते २८ टक्क्यांनी वाढले आहे.

पाचशे-हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर या जुन्या नोटा देवाच्या चरणी वाहून त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काही भाविक करतील असा अंदाज होता. मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांनी गेल्या काही दिवसात आपली दानपेटी तपासली असता तो बऱ्यापैकी खरा ठरल्याचे चित्र आहे. एरवी साधारणपणे जितक्या पाचशे-हजाराच्या नोटा दानपेटीत आढळून येतात त्या पेक्षा आठवडाभरात त्या निश्चितपणे वाढल्या आहेत. सिद्धीविनायक मंदिरात आठवडाभरानंतर बुधवारी दानपेटी उघडण्यात आली. तेव्हा तब्बल १.२० लाख रुपयांच्या आसपास पाचशे-हजाराच्या नोटा आढळून आल्या. गेल्या आठवडय़ात ही रक्कम ८८ हजार रुपयांच्या आसपास होती. तर एकूण जमा झालेली रक्कम आहे, ५९.४७ लाख. गेल्या आठवडय़ात ती याहून कमीच होती.

महत्त्वाचे म्हणजे यंदा सिद्धिविनायकाच्या मंदिरात यंदा मंगळवारी भाविकांचा ओघ आटला होता. तरिही इतक्या मोठय़ा प्रमाणात दानपेटीत रक्कम जमा झाली आहे. मंदिराच्या दानपेटीत गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पाचशे-हजाराच्या नोटांच्या संख्येत २८ टक्यांनी वाढ झाली आहे, असे मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’ला सांगितले.

पाचशे-हजाराच्या नोटाबंदीनंतर श्री सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर प्रशासनांनी भक्तांकडून अभिषेक आणि देणगी स्वरूपात जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. मात्र दानपेटीत या नोटा टाकण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी प्रशासनाने घातली नव्हती. यामुळे दानपेटीत मोठय़ा प्रमाणावर पाचशे-हजारचे चलनाचा साठा होईल असे वाटत होते. मात्र सिद्धीविनायक मंदिर वगळता इतर देवस्थानांच्या दानपेटीत या जुन्या नोटा फारशा जमा झालेल्या नाहीत.

मुंबादेवी मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले की, सरकारने जुन्या नोटा स्विकारण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. म्हणूनही दानपेटीत पाचशे-हजाराच्या नोटा वाढल्या नसाव्या.’

Story img Loader