मुंबई : वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदाराची यादी यंदाही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तयार केली आहे. संपूर्ण मुंबईतील अशा ५०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांनी २०१० पासून किंवा त्याआधीपासून पालिकेचा तब्बल ३९८१ कोटी मालमत्ता कर थकवला आहे. या थकबाकीदारांमध्ये मोठे विकासक, आस्थापना, राज्य सरकारचे विविध विभाग यांचा समावेश आहे.

मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्राोत आहे. चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट्य ६ हजार २०० कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष मार्च अखेरीस संपत असले तरी पालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा डिसेंबर अखेरीसपर्यंत करावा लागतो. तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर दोन टक्के दंडाची तरतूद आहे. मात्र मुंबईतील अनेक मोठ्या थकबाकीदारांनी पालिकेचा मालमत्ता भर गेल्या अनेक वर्षात भरलेला नाही. अशा मोठ्या थकबाकीदारांची यादी करनिर्धारण व संकलक विभागाने तयार केली आहे. यंदा संपूर्ण मुंबईतील तब्बल ५०० बड्या थकबाकीदारांची यादी पालिका प्रशासनाने तयार केली आहे. दीड कोटीपेक्षा जास्त थकीत मालमत्ता कर असलेल्या आस्थापना, विकासक, शासकीय संस्था यांचा त्यात समावेश आहे.

आणखी वाचा-गोराई कचराभूमीवर लवकरच पर्यटनस्थळ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घोषणेनंतर पालिका प्रशासनाचा विचार विनिमय सुरू

भाडे मूल्याधारित करप्रणाली बंद करून पालिकेने २०१० मध्ये भांडवली मूल्याधारित करप्रणाली आणली. मात्र या करपद्धतीविषयी अनेक तक्रारी होत्या. या तक्रारी सोडवण्यात अपयश आल्यामुळे अनेक मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते.

राज्य सरकारच्या विविध विभागांचा समावेश

थकबाकीदारांमध्ये पालिकेचे विभागही थकबाकीदारांमध्ये कमला मिल, रघुवंशी मिल अशा मोठ्या आस्थापना आहेत. तसेच शासकीय विभागांचाही यात समावेश आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या काही इमारतींचा मालमत्ता करही थकीत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही मालमत्ता कर थकवला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे.

Story img Loader