मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या अशा बदलापूर रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या ५०० मीटर परिसराचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. ‘स्थानक परिसर सुधार प्रकल्प’ अर्थात ‘सॅटिस’अंतर्गत या स्थानकाच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पाचे नियोजन, आरेखन आणि प्रकल्प व्यवस्थापन यासाठी निविदा मागविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीएने प्रवासी, पादचारी आणि वाहनांची गर्दी नियंत्रित करून रेल्वे परिसराचा विकास करण्यासाठी ‘रेल्वे स्थानक परिसर सुधार प्रकल्प’ अर्थात ‘सॅटिस’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिवली, अंधेरी, मालाड, दादर, चेंबूर, घाटकोपर आदी रेल्वे स्थानकांत ‘सॅटिस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जागतिक बँकेची मदतही घेण्यात आली. मात्र हा प्रकल्प काही कारणाने कागदावर राहिला. आता मात्र एमएमआरडीएने बदलापूर रेल्वे स्थानकात हा प्रकल्प राबिण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Video: “मला वाटत होतं, या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे…”, संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “बाकी सगळे…!”

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘सॅटिस’अंतर्गत बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ५०० मीटरपर्यंतच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत पदपथांचे रुंदीकरण, बस स्थानकांचे स्थलांतर, सायकल स्टॅन्ड, खासगी वाहन क्षेत्र, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुशोभीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागातून भविष्यात मेट्रोही धावणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक परस्परांना जोडण्याच्या सुविधेचाही त्यात समावेश आहे. येथील वाहनतळ सुविधेतून उपलब्ध होणाऱ्या महसुलातून या प्रकल्पाचा आणि देखभालीचा खर्च भागविण्यात येणार आहे. तसेच जाहिरातींसाठी भाड्याने जागा देण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : पार्किंगच्या वादात एअर गनने धमाकावले

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएने पहिले पाऊल उचलले आहे. प्रकल्पाचे नियोजन, आरेखन आणि प्रकल्प व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा मागवून परिसराचा विकास करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 meters area around badlapur railway station will be developed mumbai print news ssb
Show comments