मुंबई : मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरू केली आहेत. या मनोरुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी या रुग्णालयांमधील विविध प्रवर्गांतील ५०० पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महारेराचे ‘महाकृती’ संकेतस्थळ कार्यान्वित; संकेतस्थळाच्या वापराबाबत प्रशिक्षण सुरू

मानसिक आघात किंवा पूर्णत: मानसिक संतुलन बिघडलेल्या, मानसिक आजार असलेल्या देशभरातील व्यक्तींना उपचारासाठी राज्यातील शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात आणण्यात येते. मात्र या रुग्णांना आराेग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा अभाव असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यातील चार मनोरुग्णालयांमध्ये मंजूर असलेल्या २ हजार १९६ पदांपैकी ४९६ पदे रिक्त आहेत.

हेही वाचा >>> वाहतूक कोंडीमुक्तीची आशा; सागरी किनारा मार्गाच्या एका बाजूची वांद्रेवरळी सागरी सेतूशी जोडणी

ठाणे मनोरुग्णालयातील ७२३ मंजूर पदांपैकी १४२ पदे रिक्त आहेत. तर पुणे मनोरुग्णालयातील ९५४ मंजूर पदांपैकी १९१ पदे, नागपूर मनोरुग्णालयातील ३७५ मंजूर पदांपैकी ११५ पदे आणि रत्नागितरी मनोरुग्णालयातील १४४ मंजूर पदापैकी ४८ पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे चतुर्थ श्रेणीतील आहेत. ठाणे मनोरुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणीतील सर्वाधिक १०७ पदे रिक्त असून, पुरुष व स्त्री परिचर यांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. पुणे मनोरुग्णालयातही १३६ पुरुष व स्त्री परिचर, नागपूरमध्ये ९० पदे, तर रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये १९ पुरुष व स्त्री परिचर यांची पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठाणे मनोरुग्णालयातील पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘अ’, ‘ब’ व ‘क’ वर्गातील काही पदे भरली असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या माध्यमातून उर्वरित पदे भरण्यात येत आहेत. तसेच ‘ड’ वर्गाच्या काही निकषांबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्या भरतीला विलंब होत आहे. – डॉ. नेताजी मुळीक, प्रमुख, ठाणे मनोरुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 vacant posts in mental hospital in maharashtra mumbai print news zws