तंबाखूसारख्या दिसणाऱ्या ‘मॅजिक मिक्स’ची व्यसन सोडविण्यास मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंबाखू सोडण्याची इच्छा आहे..परंतु तलफ सोडू देत नाही.या कारणाखाली तंबाखूच्या अधीन गेलेल्यांसाठी बेस्टच्या वैद्यकीय विभागाने एक अनोखी उपाय काढला आहे. तंबाखूप्रमाणे दिसणारा ‘मॅजिक मिक्स’ नावाचा पदार्थ तयार केला असून याच्या वापराने बेस्टमधील ५००० कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या विळख्यातून सोडविले आहे.

‘तंबाखूमुक्त बेस्ट’ हा कार्यक्रम २०१३ साली बेस्टने हाती घेतला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू केली. बस चालविताना किंवा कामावर असताना हातात तंबाखू मळल्याशिवाय कामच करावेसे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तंबाखूच्या आहारी गेलेल्या जवळपास सर्वच बेस्ट कर्मचाऱ्यांची होती. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून वैद्यकीय विभागाने तंबाखू समान दिसणारा ‘मॅजिक मिक्स’ नावाचा पदार्थ तयार केला. २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम दालचिनी आणि चार ते पाच लवंग यांचे मिश्रण करून पूड केली जाते. ही पूड तंबाखूप्रमाणेच थोडीशी जाडीभरडी असते. चुना म्हणून तांदळाच्या पावडरचा वापर केला जातो, अशी माहिती बेस्टच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांनी दिली. ‘तंबाखू की आरोग्य’ या विषयावर टाटा मेमोरिअल येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत या उपक्रमाचे सादरणीकरण डॉ. सिंघल यांनी केले.

बेस्टमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांना तंबाखूचे व्यसन जडलेले आहे. यातील बहुतांश जणांचे व्यसन हे शारीरिकपेक्षाही मानसिकदृष्टय़ा अधिक आहे. तंबाखू खातात त्याच पद्धतीने ‘मॅजिक मिक्स’ खाल्ल्यानंतर त्यांना समाधान मिळते. ‘मॅजिक मिक्स’मधील दालचिनी तंबाखूची नशा सोडल्यानंतर वाटणाऱ्या परिणामांपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्यांना तंबाखू सोडणे शक्य झाले आहे. बेस्टमधील आतापर्यंत पाच हजार कर्मचाऱ्यांनी हे चूर्ण खाण्यास सुरुवात केली असून तंबाखूपासून मुक्ती मिळविली आहे, असे डॉ. सिंघल यांनी सांगितले. तंबाखू सोडण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह दादर येथील वैद्यकीय विभागात बोलाविले जाते. तेथे ‘मॅजिक मिक्स’ कसे तयार करायचे याबाबत माहिती दिली जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनुभवाचे बोल..

वयाच्या विशीत तंबाखूची सवय लागली होती. दररोज एक ते दीड तंबाखूची पुडी लागायची. तंबाखू खाल्ल्याशिवाय बस चालवणे शक्य नसायचे. पण एका मित्राला तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर त्याची अवस्था पाहून निर्धार केला. पत्नीसह दादरच्या दवाखान्यात जाऊन ‘मॅजिक मिक्स’ची माहिती घेतली. गेल्या तीन महिन्यांपासून तंबाखू सुटली आहे. तंबाखूमुळे तोंडाचा संसर्ग होत होता. तोही आता बरा झाला आहे.

-धनाजी शेंडगे (वय ४२), बसचालक, गोराई आगार

जवळपास २० वर्षांपासून तंबाखू खात होतो. मात्र, वारंवार अपचनाचा त्रास व्हायचा. शेवटी तंबाखू कायमची सोडायचे ठरवले. गेल्या सहा महिन्यापासून तंबाखूला रामराम ठोकला आहे. आता हे चूर्ण हातावर मळून तंबाखूसारखे खातो. सुरुवातीला तंबाखूप्रमाणे दिवसातून अनेकदा चूर्ण खायला लागायचे. परंतु हळूहळू प्रमाण कमी झाले. अपचनाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे.

-प्रकाश गांगुर्डे (वय ५०), वाहक, मुलुंड आगार