शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या पाच महिन्यांनंतर पुन्हा एका आठवडय़ातील रुग्णसंख्या ५० हजारांहून अधिक नोंदली गेली आहे. अकोला, अमरावती, वाशिम आणि जळगाव येथे सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे, तर आठवडय़ाभरात अमरावती येथे मृतांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजे ११ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या ऑक्टोबरनंतर आटोक्यात आलेला करोनाचा प्रादुर्भाव फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुमारे ५० हजार रुग्णांचे निदान झाले होते; परंतु त्यानंतर ही संख्या उत्तरोत्तर कमी होत जानेवारीत १७ हजारांपर्यंत घसरली होती; परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली. गेल्या महिन्याभरात मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत संसर्ग वाढत असून आता पुन्हा दर आठवडय़ाला नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली आहे.

अमरावतीतील रुग्णवाढ कायम आहे. गेल्या आठवडय़ाभरात अमरावती शहरात १० टक्के, तर जिल्ह्य़ात १२ टक्के रुग्णवाढ नोंदवण्यात आली. त्याचबरोबर आता अकोल्याच्या ग्रामीण भागातही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. आठवडय़ाभरात तेथील रुग्णसंख्या १५ टक्कय़ांनी वाढली आहे. अकोला शहरातील रुग्णांचे प्रमाण ११ टक्कय़ांनी वाढले आहे. वाशिममध्येही रुग्णवाढ कायम असून गेल्या आठवडय़ात १२ टक्के रुग्णवाढ झाली आहे. जळगाव शहरातही रुग्णसंख्येत ९ टक्कय़ांनी वाढ झाली आहे.

तीन टक्क्यांहून अधिक रुग्णवाढ

राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. धुळे शहर, मालेगाव शहर, नंदुरबार, औरंगाबाद शहर, जालना, हिंगोली, परभणी, लातूर शह, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्य़ांमध्ये आठवडय़ाभरात रुग्णसंख्येत तीन टक्कय़ांहून अधिक वाढ झाली आहे.

बाधितांचे प्रमाण दुप्पट

राज्यात महिन्याभरात बाधितांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दररोज सरासरी ६१ हजार चाचण्या केल्या जात होत्या. बाधितांचे प्रमाणही सरासरी पावणेपाच टक्के होते. मार्चमध्ये चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून पहिल्या आठवडय़ात प्रतिदिन सरासरी ८२ हजार चाचण्या केल्या गेल्या. त्यांतून बाधितांचे प्रमाण सरासरी दहा टक्के आढळले आहे.

अमरावतीमध्ये मृतांचे प्रमाण अधिक

गेल्या आठवडय़ात मृतांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजे ११ टक्के वाढ अमरावतीत नोंदवली गेली. मृतांमध्ये सर्वाधिक रुग्ण ७० वर्षांवरील सहव्याधी असलेले आहेत. अनेक रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात उशिराने दाखल होत आहेत, असे अमरावती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्यामकुमार निकम यांनी सांगितले. त्याखालोखाल जळगाव शहर, जालना, अकोला, यवतमाळ येथेही मृतांचे प्रमाण वाढले आहे.

अतिआत्मविश्वास धोकादायक : डॉ. राहुल पंडित

अनेक जिल्ह्य़ांमध्ये पुन्हा संसर्ग फैलाव होत असून ही चिंताजनक बाब आहे. प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब अजूनही योग्य रीतीने होत नाही. खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी एकत्र येऊन लसीकरण अधिक वेगाने करायला हवे. तसेच विषाणूमध्ये काही बदल होत आहे का, हे समजावे यासाठी वारंवार ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करत राहणेही गरजेचे आहे. लस आल्याने लोकांमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाल्याचे जाणवते. हा अतिआत्मविश्वास अधिक धोकादायक आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.

देशात १८ हजारांहून अधिक बाधित

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या १८ हजारांहून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले. गेल्या २४ तासांत १८,७११ जणांना संसर्ग झाल्याने एकूण रुग्णसंख्या एक कोटी १२ लाख १० हजार ७९९ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत १०० रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या एक लाख ५७ हजार ७५६ झाली आहे. २४ तासांतील मृतांमध्ये महाराष्ट्रातील ४७ जणांचा समावेश आहे.