मुंबई : शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उच्च न्यायालयातील ५२ वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक व्यवहाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

तक्रारादार खार येथील रहिवासी असून त्यांना १३ जुलै २०२४ रोजी शेअर्स खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. अमेरिकेतील सिक्युरिटी नावाने हा ग्रुप तयार करण्यात आला होता. पोलिसांच्या तक्रारीनुसार, दिलेल्या लिंकवर वकिलांनी क्लिक केल्यानंतर त्यांना व्हीआयपी व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यात गुंतवणूकीबाबत सल्ला देण्यात येत होता. वकिलांनी सुरुवातीला लहान रक्कम गुंतवून पाहिली आणि त्यांना फायदा झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा…पुनर्वसनासाठी केवळ सात मासळी विक्रेत्या महिला पात्र, पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाला सादर

तक्रारदाराचा विश्वास संपादन केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना बीव्हीई नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर वकील त्या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ग्राहक सेवा सहाय्यक त्यांना गुंतवणूकीबाबत मदत करीत होता आणि गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी मार्गदर्शन करीत होता. हळूहळू तक्रारदाराने एक कोटी ५८ लाख रुपये गुंतवले. ॲपमध्ये त्यांना चार कोटी रुपये नफा झाल्याचे दिसत होते. त्यावेळी तक्रारदार वकिलांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण पैसे हस्तांतरित झाले नाहीत. त्यांनी सेवा कार्यकारी व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने रकमेवर कर भरल्यानंतर ती हस्तांतरित होईल, असे सांगितले. कर भरूनही तक्रारदारांना रक्कम काढता आली नाही. त्यानंतर त्यांना व्हॉट्स ॲप ग्रुपमधून काढण्यात आले.

हेही वाचा…पुण्यात ‘अमूल’चा आईस्क्रीम प्रकल्प जाणून घ्या, प्रकल्प किती मोठा, परिणाम काय

अखेर तक्रारदार वकिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी नुकतीच पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीच्या सदस्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader