सांताक्रुझ पूर्व येथे ५३ वर्षीय व्यक्तीला मारहाणीनंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात यापूर्वी मारहाण व हत्यारबंदी कायदयांतर्गत दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>‘Scam 2003 The Telgi Story’ वेबमालिकेविरोधात तेलगीच्या मुलीची न्यायालयात धाव
सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार रोडवरील महत्मा नगर येथे हा प्रकार घडला. त्यात सुधीर दिगंबर पोळ(५३) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोळ यांचा मुलगा सुधांशु(२३) याच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याप्रकरणी पोलिसांनी अमित तुकाराम बेळणेकर(४५) याला अटक केली. मृत पोळ यांनी जुन्या भांडणाबाबत बेळणेकर याला गुरूवारी जाब विचारला. त्यावरून झालेल्या वादातून बेळणेकरने पोळ यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात पोळ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाच्या तक्रारीवरून तात्काळ बेळणेकरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीविरोधात २००८ मध्ये सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मारामारी व २०२० निर्मल नगर पोलीस ठाण्यात हत्यारबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.