मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या ‘डी. एन. नगर – मंडाळे मेट्रो – २ ब’ मार्गिकेचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता एमएमआरडीने या मार्गिकेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. या मार्गिकेतील मंडाळे कारशेडच्या कामालाही गती देण्यात आली आहे. आतापर्यंत या कारशेडचे ५४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>अनिल देशमुख यांची सुटका; १४ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वागताला

डी .एन. नगर – मंडाळे ही मार्गिका २३.६४ किमी लांबीची असून ही ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ मार्गिकेतील विस्तारीत मार्गिका आहे. ही मार्गिका पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारी असून यामुळे दहिसर – मानखुर्द प्रवास थेट आणि अतिजलद होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका मुंबईकरांच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गिचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करून ती वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे. त्यामुळेच आता एकिकडे एमएमआरडीएने ‘मेट्रो – २ ब’मधील पाच रेल्वे ओलांडणी पुलाच्या (पाच रेल्वे मार्गिका मेट्रो मंडाळेपर्यंत जाणार आहे) कामाला वेग दिला आहे. तर दुसरीकडे कारशेडचे कामही प्राधान्यक्रमावर घेतले आहे. मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कारशेड उभारण्यात येत असून ही प्रामुख्याने सरकारी जमिनीवर आराराला येत आहे. या कारशेडचे ५४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबई महापालिकेत ठाकरे-शिंदे गटांत संघर्ष; शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी दोन्ही गटांचा प्रयत्न

मंडाळे कारशेडमध्ये स्टेबलिंग यार्ड, हाजार्ड स्टोर इमारत हेवी वॉश प्लान्ट, भूमीगत टाकी, डीसीसी प्रशासकीय इमारत, सेंट्रल स्टोअर इमारत, वर्कशॉप, तपासणी इमारत, सी.एम.व्ही. इमारत, रिसीव्हिंग सबस्टेशन, चाचणीसाठी रूळ, ईटीपी आणि एसटीपी संरक्षण भिंत, टेहळणी मनोरा इत्यादी सुविधांचा समावेश आहे. दरम्यान, एमएमआरडीएने मंडाळे कारशेडमध्ये धूळ शमन यंत्रणाही उभारली आहे. मानखुर्द, मंडाळे परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे येथे मेट्रो प्रकल्प आणि कारशेड उभारताना एमएमआरडीएकडून येथील पर्यावरणाला कोणताही धक्का बसणार नाही याची काळजी घेत काम करण्यात येत असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. यासाठीच एमएमआरडीएने पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंडाले कारशेडमध्ये धूळ उत्सर्जन नियंत्रणासाठी उपाययोजना केली आहे. त्यानुसार प्रकल्पस्थळी वेळोवेळी पाणी शिंपडणे, वायू प्रदुषण कमी करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरणे, उत्खनन सामग्री घेऊन जाणारी वाहने ताडपत्रीने झाकून ठेवणे, धूळ उत्सर्जन कमी होईल अशा प्रकारे रचलेले उत्खनन साहित्य वापरणे, सर्व उत्खनन केलेल्या साहित्याची नियमितपणे नियुक्त केलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावणे आदी धूळ नियंत्रण करण्याच्या दृष्टीने विविध गोष्टींचा अवलंब करीत असल्यामुळे मंडाळे कारशेडच्या परिसरात हवेची आणि आवाजाची गुणवत्ता पातळी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानक मर्यादेत नोंदवली गेली असल्याचेही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच ही मार्गिका वेळेत पूर्ण करून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 percent work of mandala carshed of metro 2b is complete mumbai print news amy