लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला पदवी बनावट असल्याचे सर्वांना सांगून बदनामी करण्याची भीती घालून एका टोळीने ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याने दुखावलेले दोघे जण त्याला ठार मारणार असल्याचे सांगून ते प्रकरण मिटविण्याचा नावाखाली दोन लाख उकळले. अखेर, अभियंत्याने पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तीन लाखांची खंडणी स्वीकारताना सहा जणांना अटक केली. आरोपीने चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य असल्याचे भासवून तक्रारदाराशी संपर्क साधला होता.
चेंबूरला राहणाऱ्या पालिका अभियंत्याच्या तक्रारीनुसार, २७ जुलै ते २३ सप्टेंबरदरम्यान आरोपींकडून त्यांचा मानसिक छळ सुरू होता. याप्रकरणी प्रताप चौखंदरे उर्फ बबलु (४९), अभयराज पटेल उर्फ राजभाई (४८), संतोष पुजारी (४५), शेखर सकपाळ (३३), आशिवा पांडे (३३), रफिक मुलानी (४२) अशी अटक आरोपींची नावे असून ते गोरेगाव, अंधेरी आणि कांदिवलीतील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, सर्वांनी तक्रारदाराला शैक्षणिक पदवी खोटी असल्याची भीती दाखवून बदनामीची धमकी दिली. तसेच, तक्रारदारांमुळे दोघे जण दुखावले असून ते हत्या करू शकतात. प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी एकूण ५५ लाखांची मागणी केली.
आणखी वाचा-नाहूरमध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावाला विरोध, पक्षीगृहाऐवजी अत्यावश्यक सुविधांची मागणी
आरोपींकडून पैशांची मागणी वाढल्याने त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने सोमवारी सापळा रचला आणि आरोपींना ३ लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
नेमकी घटना काय ?
तक्रारदारांना शेखर सकपाळ नावाच्या व्यक्तीकडून दूरध्वनी आला. सकपाळने स्वत:ची ओळख गोरेगाव येथील अभिनव चॅरिटेबल ट्रस्टचा प्रतिनिधी म्हणून करून दिली. तक्रारदारांविरोधात तक्रार आहे. त्यात त्यांचे पदवी प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप आहे. सकपाळने तक्रारदाराला त्याच्याशी पुढील चर्चा करण्यासाठी १० दिवसांत त्याच्या कार्यालयात येण्याचे सांगितले. याप्रकरणी कोणी तक्रार दिल्याबद्दल विचारले असता सकपाळने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच भेट न घेतल्यास कारवाईची धमकी दिली.
या दूरध्वनीमुळे चिंताग्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्याच्या परिचित ज्योतिषी सुखलाल गर्ग यांच्याशी संपर्क साधून सल्ला घेतला. गर्गने त्याला प्रताप चौखंदरे ऊर्फ बबलू (४९) यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर बबलूच्या माध्यमातून अभयराज पटेल ऊर्फ राजभाई (४८) या प्रकरणात सहभागी झाले. पटेलने ट्रस्टच्या प्रतिनिधींशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले.
आणखी वाचा-आणखी तीन रुग्णालयांमध्ये पोलिसांना वैद्यकीय तपासणी करता येणार
दुसऱ्या दिवशी, पटेलने तक्रारदाराला ट्रस्टच्या कार्यालयात नेले, जिथे त्याची शेखर सकपाळ (३३) आणि संतोष पुजारी ऊर्फ राजू नायर (४५) यांच्याबरोबर भेट झाली. त्यावेळी तेथे इतरही काहीजण उपस्थित होते. सकपाळ आणि पुजारी यांनी तक्रारदाराची सर्व वैयक्तिक माहिती सार्वजनिक करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याची धमकी दिली. तक्रारदाराने हा प्रकार गर्ग यांना सांगितला. त्यावेळी त्यांनी एक छोटी रक्कम देऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादीने सकपाळ आणि पुजारी यांना २ लाख रुपये दिले. तक्रारदार आणि आरोपींमध्ये अनेक वेळा दूरध्वनीवरून चर्चा झाली. तक्रारदाराने पैसे कमी करण्यास सांगितले. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी पुजारीने तक्रारदाराला मरीन ड्राइव्हमधील एका हॉटेलात बोलावले आणि त्याला एकाच वेळी सर्व रक्कम देण्याचा सल्ला दिला.
पुजारीने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा तक्रारदाराला दूरध्वनी करून ३ लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर तक्रारदारांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण थोरात यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यावेळी तीन लाख रुपये दिल्यानंतर संतोष पुजारीला अटक करण्यात आली. त्यानंतर इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी खंडणीचा गुन्ह दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.