मुंबई : वधू- वर सूचक संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीने अंधेरीमधील ४१ वर्षीय महिलेची ५५ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी समर्थ भाईंदरकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समर्थ ऑनलाइन शॉपिंग कंपनीत कामाला आहे. आपल्याला ७५ हजार रुपये पगार असल्याचे त्याने तक्रारदार महिलेला सांगितले होते.

गोरेगावमधील एका खासगी कंपनीत मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एमआयएस) एक्झीक्युटिव्ह पदावर कार्यरत असलेल्या महिलेने मंगळवारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने तक्रारदार महिलेला लग्न करण्याचे आणि भागीदारीत मोबाइलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले होते. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. तिने तिचे सोन्याचे दागिने विकले, बँकेतून आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले. तसेच ती काम करीत असलेल्या कंपनीतूनही तिने कर्ज घेतले होते आणि तिने त्याला व्यवसायासाठी ५५ लाख ४२ हजार रुपये दिले.

हेही वाचा >>>प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी सीईटी कक्ष महाविद्यालयांच्या दारी, राज्यात विविध विभागात सुसंवाद कार्यक्रम

आपले १२ वीपर्यंत शिक्षण झाले असून आपण एका सधन कुटुंबातील आहोत. आई कपड्यांचा व्यवसाय करते आणि वडील दमणमधील दोन दुकाने आणि घरे सांभाळतात असे समर्थने तक्रारदार महिलेला स्वतःची ओळख करून देताना सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.व्यवसायात होणाऱ्या नफ्यातील हिस्सा लवकरच देण्याचे आश्वासन त्याने तक्रारदार महिलेला दिले होते. परंतु निर्धारित वेळेत तो तिला पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने नफा व मुद्दल अशी एकूण ६८ लाख रुपयांची मागणी केली. त्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले आणि जानेवारीमध्ये तिला एक संदेश पाठवला. त्यात त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४२० (फसवणूक) आणि ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक) अंतर्गत समर्थविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.