मुंबई : विलेपार्ले येथे रस्त्यावर काम सुरू असताना जेसीबी अंगावरून गेल्यामुळे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जेसीबी मागे घेत असताना हा अपघात झाला. त्यानंतर चालक व क्लिनर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. सीसी टीव्हीची चित्रीकरणामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. अखेर जुहू पोलिसांनी जेसीबी चालक व क्लिनरचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको येथे एक व्यक्ती बेशुद्धवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना तेथील बांधकाम पर्यवेक्षकाने रविवारी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ५० ते ५५ वर्ष वयोगटातील एक व्यक्ती रस्त्यावर पडली होती. पोलिसांनी पाहणी केली असता त्या व्यक्तीच्या डोक्यावरून अवजड वाहन गेले होते. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. अखेर पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्या व्यक्तीची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता कोणाताही अपघाताची माहिती मिळाली नाही. मृत व्यक्ती पहाटेपासूनच तेथे बेशुद्धावस्थेत पडल्याचे समजले.

सीसी टीव्हीच्या मदतीने तपास

घटनेबाबत कोणालाही कल्पना नसल्यामुळे अखेर पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळविण्यास सुरूवात केली. तसेच परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी जेसीबी मागे घेत असताना त्याचे मागचे चाक त्या व्यक्तीच्या अंगावरून गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी क्लीनर जेसीबी मागे घेण्यासाठी चालकाला मदत करत होता. त्याने जेसीबीचे चाल संबंधित व्यक्तींच्या अंगावरून गेल्याचे पाहिले. त्यानंतर तो त्या व्यक्तीजवळ गेला. चालकही तेथे पोहोचला. पण या प्रकारानंतर दोघांनीही संंबधित व्यक्तीला वैद्यकीय मदत न करता तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी इतर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या मदतीने तपास केला असता अपघातग्रस्त वाहन चालकाने अंधेरी पश्चिम येथील एम. ए. हायस्कूलजवळ उभे केल्याचे समजले. अखेर पोलिसांना जेसीबीचा क्रमांक प्राप्त झाला.

आरोपींपर्यंत पोहोचले

अंधेरी पश्चिम येथे जेसीबीच्या क्रमांकावरून पोलिसांना चालक व क्लिनरची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला. जेसीबी चालक संतराम त्रिवेणी पाल (३८) व क्लिनर दत्ता विश्वनाथ शिंदे यांंच्यापर्यंत पोलीस पोहोचले. चौकशीत त्यांनी अपघात केल्याचे मान्य केले. अखेर पोलिसांनी स्वतः याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. दोघांनाही याप्रकरणी नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्ती तेथे रस्त्यावर झोपला होता. त्याच्या डोक्यावरून जेसीबी गेल्यामुळे अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. आरोपी चालक अंधेरी व क्लिनर विलेपार्ले येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader