‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे दिवाळीच्या वेळी सुमारे २५०० घरांची सोडत काढण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील मे महिन्यात मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाची मिळून आणखी सुमारे तीन हजार घरांची सोडत काढण्यात येईल. अशारितीने येत्या वर्षभरात ‘म्हाडा’तर्फे एकूण ५५०० घरांची सोडत निघण्याची अपेक्षा असल्याचे प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी शुक्रवारी जाहीर केले.
‘म्हाडा’च्या १२४४ घरांसाठी ८७,६४७ अर्जाची सोडत शुक्रवारी निघाली. मागच्या वर्षी ‘म्हाडा’ने मे २०१३ च्या सोडतीत विरार येथील सुमारे २५०० घरे असतील अशी घोषणा केली होती. पण इतक्या मोठय़ा प्रमाणावर घरे बांधण्यासाठी इमारतींची उंची ७० मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यासाठी स्थानिक महापालिकेची परवानगी घेणे आणि त्यानुसार नियम तयार होण्याचे काम रखडले होते. त्यामुळे या सोडतीत ही घरे समाविष्ट झाली नाहीत. आता इमारतींच्या उंचीचा प्रश्न सुटत असल्याने दिवाळीत विरारच्या घरांसाठी सोडत काढता येईल अशी अपेक्षा असल्याचे गवई यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी मुंबई मंडळाची आणि कोकण मंडळाची पुढच्या टप्प्यातील विरारची घरे अशारितीने सुमारे तीन हजार घरांची सोडत काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर पुढच्या वर्षीच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत केवळ नव्याने बांधलेल्या घरांचा समावेश नसेल. तर नव्याने बांधकाम केलेली घरे, संक्रमण शिबिरातील पुनर्विकासातून येणारी घरे आणि संक्रमण शिबिरातील काही घरांची विक्री अशा तीन प्रकारातून ही घरे सोडतीत येतील, असे सांगण्यात आले. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी निरंजनकुमार सुधांशू उपस्थित होते.
‘म्हाडा’च्या घरांच्या किमती अधिक असल्याची टीका गवई यांनी यावेळी फेटाळली. खासगी बिल्डरांच्या तुलनेत आमच्या किमती सुमारे ४० टक्क्यांनी कमी असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ‘म्हाडा’च्या मुंबईतील ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी घरांचा साठा घेण्याचे आणि तीन एफएसआय देण्याचे धोरण जाहीर केल्याने यातून एक लाख घरे सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकतील, असे गवई यांनी नमूद केले. या सोडतीत ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाचे उपमुख्याधिकारी दिनकर जगदाळे यांनाही पवईतील घराची लॉटरी लागली.
विशेष म्हणजे यंदाच्या सोडतीत जवळपास ८६ अर्जदारांनी लिंगाच्या रकान्यात स्त्री वा पुरुष न लिहिता अन्य हा पर्याय निवडला होता. तृतीयपंथीयांनीही ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज केल्याचे यावरून दिसून येते.

सर्वसामान्यांसाठी एक लाख घरे
‘म्हाडा’च्या मुंबईतील ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी घरांचा साठा घेण्याचे आणि तीन एफएसआय देण्याचे धोरण जाहीर केले आहे. याने यातून एक लाख घरे सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकतील, असे गवई यांनी नमूद केले.

गवई म्हणाले..
*    भोगवटा प्रमाणपत्रामुळे गेल्या दोन-तीन वर्षांतील सोडतींमधील घरांचा ताबा रखडला असला तरी येत्या दोन-तीन महिन्यांत हे प्रश्न सुटतील आणि सदनिकाधारकांना घरांचा ताबा देण्यात येईल.
*    ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती व उत्पन्न गटाचे निकष यातील विरोधाभास संपवण्यासाठी उत्पन्न गटाचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीच्या कोकण मंडळाच्या सोडतीपूर्वीचे ते काम पूर्ण करण्यात येणार आहे.
*    ‘म्हाडा’च्या घरांचा ताबा देणे काही कारणांमुळे रखडले तर यशस्वी अर्जदारांवर आर्थिक बोजा पडतो. तो टाळण्यासाठी आता इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावरच यशस्वी अर्जदारांकडून घराचे पैसे घेणार.
*     राज्यात ठिकठिकाणी ‘म्हाडा’ने जागा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ५० ते ६० हेक्टर जागा घेतली आहे. आगामी काळात त्या जागांवर आठ ते दहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत.
*    थेऊरजवळ एका साखर कारखान्याची १५० एकर जागा आहे. ती जागा ‘म्हाडा’ने घ्यावी आणि त्यावर घरे बांधावीत असा प्रस्ताव कारखान्याने दिला आहे. त्याबाबत विचार सुरू आहे.