पनवेल येथे रंगलेल्या ५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी, ५ जानेवारी रोजी सलीम शेख लिखित व दिग्दर्शित ‘तीस तेरा’ हे नाटक सादर होईल. येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सायंकाळी ७ वाजता हे नाटक प्रेक्षकांना पाहावयास मिळेल.
नागपूरच्या नक्षत्र बहुउद्देशीय संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. अनमोल निचत, दीपाली घोंगे, क्रिष्णा पाल, स्वाती फेटे, नीरज जामगडे, रोशन खोब्रागडे, सलीम शेख, विनोद राऊत, आयेशा शेख, चारुदत्त अघोर आदींच्या त्यात भूमिका आहेत. तीस तेरा म्हणजे ३०१३चा काळ. ज्या पद्धतीने मानव विकासासाठी पर्यावरणाला वेठीला धरतो आहे, त्याचे होणारे परिणाम म्हणजे तीस तेरा. १८५०मध्ये जगात औद्योगिक क्रांतीची पहाट झाली. प्रगतीचा आलेख उंचावत असताना मानवाला १९८५मध्ये पहिल्यांदा निसर्गाची चपराक बसली. यवतमाळ जिल्ह्य़ात नापिकीमुळे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली, या आशयसूत्राच्या अनुषंगाने २०१५, २१३० आणि २५००च्या काळाचा वेध घेत हे नाटक ३०१३ या वळणावर येते. नागपूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले. तसेच दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य व रंगभूषेसाठी पहिला क्रमांक पटकावला. बुधवारी, ६ जानेवारी रोजी संजय सोनवणी यांच्या कादंबरीवर आधारित ‘असुरवेद’ नाटक सादर होईल. या नाटकाची निर्मिती कलासाधना, मुंबई पालिका कर्मचारी कलावंत संस्थेने केली आहे.
(((देवाला मानणारे व देवाला न मानणाऱ्यांमधील संघर्ष अधोरेखित करणारे ‘ज्याचा त्या चा प्रश्न’ हे अभिराम भडकमकर लिखित नाटक मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सादर होईल.))
अंतिम फेरीत ‘तीस तेरा’ व ‘असुरवेद’
नागपूरच्या नक्षत्र बहुउद्देशीय संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-01-2016 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 55th maharashtra state marathi drama amateur tournament final round