मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सुरत यार्डमधील नॉन-इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त शनिवारी सकाळी ९.३० ते सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार ते सोमवार दरम्यानच्या ५९ रेल्वेगाड्या पूर्णत: रद्द, तर ३० रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुमारे ७५ हजारांहून अधिक प्रवाशांचे हाल होणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : जन्मठेपेच्या शिक्षेनंतर पलायन केलेल्याला आरोपीला उत्तर प्रदेशात अटक
पश्चिम रेल्वेवर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी ५६ तासांचा ब्लॉक घेऊन सुरत – उधना तिसऱ्या मार्गिकेचे व इतर कामे करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने २५ ऑगस्टपासून मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस ते गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश अप आणि डाऊन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने प्रवाशांना विश्वासात न घेता, ब्लॉकची माहिती फक्त एक दिवस आधी दिली. त्यामुळे १२० दिवसांपासून आरक्षण केलेल्या रेल्वेगाड्या थेट रद्द केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कमी कालावधीमध्ये रेल्वेगाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे. मात्र खूप कमी वेळेत पर्यायी मार्ग उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्याचे नियोजन रद्द करावे लागले आहे.
हेही वाचा >>> महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
पश्चिम रेल्वेने अचानक तीन दिवसीय ब्लॉक घेतला. एवढा मोठा ब्लॉकची माहिती आदल्यादिवशी देण्यात आली. ही बाब निंदनीय आहे. प्रवासी १२० दिवस आधीपासून रेल्वेचे आरक्षण करतात. मात्र प्रवाशांना विश्वासात न घेता, गाडी रद्द झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठवला जातो. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती
भविष्यात प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. – सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे