कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी, उपनगरीय प्रकल्पांसाठी भरीव तरतूद नाही
अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत यांसह अनेक प्रकल्पांना गती मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपये मंजूर करण्यासोबतच पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डबा प्रकल्पासाठीही १२ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले.
अंतरिम अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या निधीची वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. रेल्वेच्या एमयूटीपी-२, ३ व ३ ए साठी मंजूर झालेला निधीच कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी अंतरिम अर्थसंकल्पात जी तरतूद करण्यात आली त्यात बदल झाले नसल्याचे सांगितले.
एमयूटीपीसाठी मिळालेला निधी
एमयूटीपी- २
२४५ कोटी रुपये मंजूर (प्रकल्पाचा एकूण खर्च- ८ हजार ८० कोटी रु.)
* सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग
* परळ टर्मिनस
* ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग
* मुंबई ते बोरिवली सहावा मार्ग
एमयूटीपी- ३
२८४ कोटी रुपये मंजूर (एकूण प्रकल्प खर्च- १० हजार ९४७ कोटी)
* विरार ते डहाणू चौपदरीकरण
* पनवेल ते कर्जत नवीन मार्ग
* ऐरोली ते कळवा लिंक रोड
* ४७ वातानुकूलित लोकल
एमयूटीपी- ३ ए
५० कोटी रुपये मंजूर (एकूण प्रकल्प खर्च- ३३ हजार कोटी रु.)
* बोरिवलीपर्यंत हार्बर
* बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग
* कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग
* कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग
* १९४ वातानुकूलित लोकल
कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपये
मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारादरम्यान गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत असून नागरी वस्ती वाढू लागली आहे. सध्या कल्याण ते कसारा दोनच मार्ग असून लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा येथून जातात. त्यामुळेच लोकल प्रवास सुकर करण्यासाठी तिसरा मार्ग उभारण्याचा निर्णय २०११ मध्ये घेण्यात आला. प्रत्यक्षात सुरुवात २०१६ मध्ये झाली. अद्यापही भूसंपादनाचे काम सुरू आहे. यंदा १६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मिळाले आहेत.
* पनवेल ते कळंबोली एक्स्प्रेस गाडय़ांसाठी टर्मिनस- ८९ कोटी रुपये
* सीएसएमटीत १० ते १३ नंबर फलाटांचे २४ डबा गाडय़ांसाठी विस्तारीकरण- ४ कोटी रु.
* विक्रोळीत उड्डाणपुलासाठी ४ कोटी रुपये
* दिवा येथे उड्डाणपुलासाठी ६ कोटी रुपये
* रुळांच्या कामांसाठी १२१ कोटी रु.
* कल्याण ते लोणावळा, इगतपुरीत बोगद्यांच्या कामांसाठी ४ कोटी रुपये
* सिग्नल व अन्य तांत्रिक कामांसाठी २७ कोटी रुपये
* मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांवर ३७३ सरकते जिने- २८ कोटी रुपये
* लोकल, मेमू, डेमू गाडय़ांच्या एकूण १० हजार ३४९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे- ५ कोटी
* रुळांजवळ संरक्षक भिंत व जाळ्या – १२ कोटी रु.
* बेलापूर-सीवूड-उरण नवीन मार्ग- १५४ कोटी रुपये
पश्चिम रेल्वेला अर्थसंकल्पात काय मिळाले?
मुंबई ते दिल्लीपर्यंतची प्रवास वेळ कमी करण्यासाठी प्रतितास १६० किमी वेगाने एक्स्प्रेस धावण्यासाठी रुळांसह अन्य तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. यंदा अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय अंधेरी ते विरार धिम्या पंधरा डबा लोकल प्रकल्पासाठी (प्रकल्प खर्च- ५९ कोटी रु.) १२ कोटी रुपये तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही १० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत.