आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी ५७ दंगलखोरांवर आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र ३३८४ पानांचे आहे.
सहा खंडांमध्ये विभागलेल्या या आरोपपत्रात चारजणांविरुद्ध महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप, तर २२ आरोपींवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल उसळविणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी १०५१ साक्षीदार असून त्यापैकी ८५१ साक्षीदारांचे जबाब व ४७ पंचनाम्यांचा आरोपपत्रात समावेश आहे. त्यात पोलिसांसह ७३६ सरकारी कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या २९ प्रतिनिधींचा समावेश आहे. दंगलीचे चित्रण असलेल्या सीसीटीव्ही फूटेजचा, वृत्तवाहिन्यांनी केलेल्या चित्रीकरणाच्या ध्वनिचित्रफिती पुरावा म्हणून आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला ६३ दंगलखोरांना अटक केली. मात्र नंतर पाचजणांविरुद्ध काहीच पुरावा पुढे न आल्याने त्यांना दोषमुक्त केले. त्यामुळे ५७ जणांविरुद्ध शुक्रवारी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर ३५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपींपैकी ४५ जण सध्या जामिनावर बाहेर आहेत. एका अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पहिली अटक घटनेच्याच दिवशी, तर शेवटची अटक २० ऑक्टोबर रोजी झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा