स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग या १४.४७ किमीच्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू असून आतापर्यंत या मार्गिकेचे ५८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. कामाने वेग घेतला असला तरी मेट्रो ६ साठीच्या कारशेडच्या जागेचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.
पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांमधील अंतर कमी करून येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ६ प्रकल्प हाती घेतला आहे. ६,६७२ कोटी खर्चाच्या आणि १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो मार्गिकेच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. या मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित करण्यात आले. या जागेला तत्कालीन सरकारने मंजुरी दिली. मात्र, कांजूरमधील कारशेडमध्ये काम सुरू करण्याआधीच ही जागा वादात अडकली. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) चे कारशेड आरेतून कांजूरला मेट्रो ६ च्या प्रस्तावित कारशेडच्या जागेवर हलविले. मात्र त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मालकी हक्कावरून वाद सुरू झाला. त्याचा फटका मेट्रो ६ लाही बसला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मेट्रो ३ आणि मेट्रो ६ च्या कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तो कधी मार्गी लागेल याचे उत्तर कोणाकडे नाही.
असे असले तरी एमएमआरडीएकडून मेट्रो ६ चे काम मात्र वेगात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. काम वेगाने सुरू आहे मात्र कारशेडचे काय? याबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.