मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला तरीही महानगरपालिकेतील ५८५ कर्मचारी मूळ कामावर परतले नाहीत. संबंधित पालिका कर्मचारी निवडणुकीतील आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच कर्मचारी मूळ कामावर परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा – राज्याच्या उद्योग सचिवपदी डॉ. पी. अनबलगन, १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील सुमारे ८२ हजार कामगार, कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक करण्यात आली होती. पालिकेच्या विविध विभागातील हजारो कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले होते. परिणामी, महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कामे विलंबाने होत होती. तसेच, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत होता. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यांनतर अनेक कामगारांना निवडणूक कामातून मुक्त करण्यात आले होते. मात्र, निकालानंतरही अनेक कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी निवडणूक कर्तव्यार्थ तैनात आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही महापालिकेतील ५८५ कर्मचारी महापालिकेतील मूळ सेवेत परतलेले नाहीत. निवडणूक प्रक्रियेतील आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याचे काम संबंधित कर्मचारी करीत आहेत. आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी येत्या आठवडाभरात पुन्हा मूळ सेवेत परततील, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.