मुंबई : ओडिशामधील भीषण तिहेरी रेल्वे अपघातानंतर भारतीय रेल्वेतील रिक्त पदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेत ‘क’ संवर्गातील जवळपास ५९ हजार पदे सध्या रिक्त आहेत.
मध्य रेल्वेत २८ हजार आणि पश्चिम रेल्वेत ३० हजार ‘क’ संवर्गातील पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. मध्य रेल्वेच्या फक्त मुंबई विभागात विविध विभागांतील ८ हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय रेल्वेत एकूण तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यातील बहुतांश पदे ही सुरक्षा विभागातील असल्याचे समजते. यात पॉइंटमॅन, ट्रॅकमॅन, मोटरमन, गँगमन, मदतनीस ही पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेत २०१७ ते २०२२ पर्यंत १ लाख ७८ हजार ५४४ पदे भरल्याची आकडेवारी माहिती अधिकाराद्वारे मिळाली. २०१९ मध्ये दोन लाख जागांसाठी रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) आणि रेल्वे भरती सेल (आरआरसी)ची परीक्षा घेण्यात आली. मात्र, अद्याप भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी, प्रत्येक विभागातील रेल्वे कर्मचाऱ्याला ८ तासांपेक्षा अधिक तास काम करावे लागते.
मुंबई विभागात आणखी ८ हजार कर्मचाऱ्यांची गरज
मध्य रेल्वेमधील मुंबई विभाग सर्वाधिक वर्दळीचा आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने रेल्वे गाडय़ा धावत असून, लाखो प्रवासी आणि रेल्वेचा अवाढव्य कारभार सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. एप्रिल २०२३ मधील माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे ८ हजार ४४ पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वाधिक १,७९९ रिक्त पदे ही सिव्हीलमधील आहेत. त्यामुळे पायाभूत कामे करण्यावर मर्यादा येतात. रेल्वेचा गाडा योग्यरित्या हाकण्यासाठी असलेल्या ‘ऑपरेटिंग’ विभागात १,०५३ पदे रिक्त आहेत.