भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरहून चैत्यभूमीवर येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर या मार्गावर सहा विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिकांचा जत्था चैत्यभूमीवर येत असतो. या लोकांची परत जाण्याची सोय म्हणून मध्य रेल्वे यंदा दादर आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सहा विशेष फेऱ्या सोडणार आहे. या फेऱ्या अनारक्षित असतील. या सहा फेऱ्यांपैकी पहिल्या दोन फेऱ्या ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी अजनी आणि सेवाग्राम येथे रवाना होतील. यातील ०१००५ डाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-अजनी ही गाडी ४.०५ वाजता सुटेल. तर दुसरी गाडी ०१००७ डाउन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-सेवाग्राम ही गाडी ६.४० वाजता सुटेल.
७ डिसेंबरला ०१०११ डाउन दादर-नागपूर ही विशेष गाडी मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल. तर याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता ०१०२१ डाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-नागपूर ही गाडी रवाना होईल. ८ डिसेंबरला ०१०३५ डाऊन दादर-नागपूर ही गाडी दादरहून मध्यरात्री १२.४० वाजता निघेल. तर याच दिवशी संध्याकाळी ६.४० वाजता ०१०३७ डाउन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-नागपूर ही गाडी रवाना होईल.
‘बेस्ट’नेही चैत्यभूमीवर मुंबईतून येणाऱ्या भीमसैनिकांसाठी ५ आणि ६ डिसेंबर दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बेस्टतर्फे वरळी आगार-लोकमान्य टिळक टर्मिनस (५३), मालवणी आगार-माहीम बस स्थानक (२४१), मुंबई सेंट्रल आगार-टाटा पॉवर बस स्थानक (३५१), कन्नमवार नगर-राम गणेश गडकरी चौक (३५४) आणि चेंबूर वसाहत-वरळी आगार (४६३) या मार्गावर प्रत्येकी दोन फेऱ्या चालवल्या जातील. तर ६ डिसेंबरच्या दिवशी १५ वेगवेगळ्या मार्गावर ३३ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यात वैशालीनगर मुलुंड-वरळी आगार (२७) या मार्गावर चार फेऱ्या, वडाळा आगार-गोरेगाव आगार (३८), लोकमान्य टिळक टर्मिनस-राम गणेश गडकरी चौक (५३), गोवंडी बस स्थानक-राम गणेश गडकरी चौक (९३लि.), भायखळा स्थानक-वीर कोतवाल उद्यान (६३), मालवणी आगार-माहीम बस स्थानक (२४१) अशा विविध मार्गावर दोन दोन विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 special between mumbai nagpur railway during dr ambedkar mahaparinirvana day