मुंबई : मुंबईतील धोकादायक बनलेल्या उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मुंबईतील शहरातील भायखळा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. आतापर्यंत या पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची तपासणी करण्यात आली. यावेळी भायखळा येथील उड्डाणपुलाचे आयुर्मान ओलांडल्याने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल-एआरआयडीसी) डिसेंबर २०२१ पासून भायखळा पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. हा पूल वांद्रे सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेड आधारित आहे. या केबल-स्टेड पुलाच्या चार मार्गिका असतील. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहील. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

डिसेंबर २०२१ पासून उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, धीम्यागतीने पुलाचे काम सुरू असल्याने उड्डाणपूल तयार होण्याची अंतिम वेळ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली. परंतु, आता ऑक्टोबर २०२५ ही अंतिम वेळ निश्चित केली असून, त्यानुसार वेगात कामे हाती घेतली आहे.

सीएसएमटी येथून जे.जे. उड्डाणपूलमार्गे भायखळ्यापर्यंतचा प्रवास जलदगतीने करता येतो. मात्र पुढे भायखळ्याला मोहम्मद अली रोड आणि मुंबई सेंट्रल, नागपाड्यातून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे भायखळा सिग्नल, रेल्वे स्थानक परिसर, तसेच पूर्वेला अग्निशमन दल मुख्यालय, बकरी अड्डा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी भायखळा पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाणपूल फायदेशीर ठरेल.

पुलावर अत्याधुनिक सजावटीसाठी एलईडी विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुलाच्या आकर्षणात भर पडेल. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष तिरंगी प्रकाशयोजना करण्यात येईल. या पुलावर सेल्फी पाॅइंट्स असणार आहे. त्यामुळे पुलावरून छायाचित्र टिपणे सोयीस्कर होईल.

– या पुलाची उंची ९.७० मीटर उंच व लांबी ९१६ मीटर असेल.

– सेल्फी पॉइंट

– प्रकल्पाची अंदाजित रक्कम २८७ कोटी रुपये

– एकूण ४ मार्गिका

– २२ डिसेंबर २०२१ रोजी पुलाच्या कामाला सुरुवात

– ऑक्टोबर २०२५ पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित

Story img Loader