मंगल हनवते
मुंबई : पुणे-सातारा महामार्गावरून सातारा, महाबळेश्वर, बंगळूरुला जाण्यासाठी खंबाटकी घाट पार करावा लागतो. घाटातील या प्रवासासाठी किमान ४५ मिनिटे लागतात. पण, जून २०२४ पासून हा प्रवास केवळ दहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) खंबाटकी पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम सुरू केले असून जून २०२४ मध्ये हे काम पूर्ण होत असल्याने हा वेग वाढणार आहे.
खंबाटकी घाटातून दररोज ५५ हजार वाहने धावतात. यासाठी किमान ४५ मिनिटे लागतात. अनेकदा येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. साताऱ्यावरून पुणे-मुंबईला येण्यासाठी खंबाटकी घाटात सध्या दोन मार्गिकांचा एक बोगदा आहे. येथून पुण्याच्या दिशेने एकेरी वाहतूक होते. त्यामुळे बोगदा असतानाही साताऱ्यावरून पुण्याला येण्यासाठीही बराच वेळ लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन ‘एनएचएआय’ने खंबाटकी घाट येथे पोहच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ६.४६ किमीच्या या प्रकल्पाच्या कामास २८ फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. ९२६ कोटी रुपये असा खर्च असलेला हा प्रकल्प पुणे-सातारा महामार्गावरील वेळे येथून सुरू होतो आणि खंडाळा येथे येऊन संपतो. प्रत्येकी तीन मार्गिकेच्या या बोगद्यांची रुंदी १६.१६ मीटर असून उंची ९.३१ मीटर आहे. वाहनचालक, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी या प्रकल्पात आवश्यक त्या सर्व सुविधा विकसित करण्यात येत आहेत.या बोगद्याचे, पोहच मार्गाचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ‘एनएचएआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.