लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) शुक्रवारपासून दादर बस स्थानक – औंध (पुणे स्थानक) दरम्यान ई-शिवनेरी सेवा सुरू केली असून शुक्रवारपासून दादर – पुणे आणि पुणे – दादर दरम्यान प्रत्येकी १५ फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. येत्या दोन दिवसांत या मार्गावरून ई-शिवनेरीच्या आणखी ३० फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे नव्या ई-शिवनेरीचा प्रवाशांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
इंधनावरील खर्चात बचत करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. एसटी महामंडळाची प्रीमियम ब्रँड अशी शिवनेरी ओळख आहे. त्यामुळे विजेवर धावणारी शिवनेरी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ठाणे – पुणेदरम्यान पहिल्या ई-शिवनेरीची सेवा सुरू करण्यात आली. या शिवनेरीला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने ई-शिवनेरीच्या ताफ्यात वाढ करण्यात येत आहे. डिझेलवरील शिवनेरीच्या जागी आता ई-शिवनेरी धावणार आहे.
आणखी वाचा-विधी शाखेच्या चौथ्या सत्राची परीक्षा १२ जूनपासून
दादर बस स्थानकातून शुक्रवारी पहिली ई-शिवनेरी बस औंधला (पुणे स्थानक) रवाना झाली. तसेच या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
परळ येथे चार्जिंग पॉईंट
ई-शिवनेरीसाठी परळ येथे विद्युत प्रभारणासाठी (चार्जिंग) यंत्रणेची उभारणी करण्यात येत होती. हे काम पूर्ण झाल्याशिवाय ई-शिवनेरी चालवणे अशक्य होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाल्याने बसच्या चार्जिंगची समस्या सुटली. त्यामुळे दादर – पुणे ई-शिवनेरी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. एकदा चार्जिंग केल्यानंतर ई-शिवनेरी ३०० किमी अंतर धावू शकते, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.
दादर – पुणे मार्गावरील पहाटे आणि सायंकाळी दर १५ मिनिटाच्या अंतराने या बसची एक फेरी चालवण्यात येईल. तसेच दुपारी १२ नंतर एक तासाने आणि दुपारी १ नंतर पुन्हा १५ मिनिटांनी एक फेरी चालवण्यात येईल.
आणखी वाचा-बोरिवलीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका
असे आहे वेळापत्रक
पहाटे ५.१५, पहाटे ५.३१, पहाटे ५.४५, सकाळी ६.१५, सकाळी ६.३१, दुपारी १२.१५, दुपारी १.१५, दुपारी १.३१, दुपारी १.४५, दुपारी २.३१, सायंकाळी ५.१५, सायंकाळी ५.३१, सायंकाळी ५.४५, सायंकाळी ६.१५, सायंकाळी ६.३१ अशा १५ फेऱ्या दादर – पुणेदरम्यान धावतील.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी तिकीट दर ५१५ रुपये
५० टक्के सवलतीधारक प्रवाशांसाठी तिकीट दर २७५ रुपये