मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील सोळा आमदारांना दोन महिन्यांपूर्वी बजावलेल्या नोटिशीला त्यांनी दिलेली सहा हजार पाने उत्तरे हा तर वेळकाढूपणा असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. हे सर्व वाचण्यासाठी वेळ लागणार असल्याच्या सबबीखाली नार्वेकर हे वेळ मारून नेतील, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी जूनमध्ये सत्तासंघर्षांत शिवसेनेतील १६ आमदार पहिल्या टप्प्यात फुटले होते. त्यानंतर ही संख्या ४० आमदारांपर्यंत गेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने पहिल्यांदा फुटलेल्या या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नार्वेकर यांनी त्या १६ आमदारांना उत्तर दाखल करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला १६ आमदारांनी उत्तर दिले. उत्तराची एकत्रित पाने सहा हजार आहेत.

मनाने फुटलेल्यांना कसे रोखणार?

राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही. मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते. त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केली. जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा खूप वाईट वाटते. तुमच्यापैकी कोणाला आजही पक्ष सोडून जावेसे वाटत असेल तर खुशाल जा, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे पक्षासाठी रक्त सांडले, त्यांना नाराज करायचे नाही म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांना धूळ चारण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सूचना त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6000 pages argument of 16 mlas of shinde group to the assembly speaker rahul narvekar ysh