मुंबई : मालाड येथील मीठ चौकी उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना थोडासा दिला मिळाला असून हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला होऊन दोन महिने झाले आहेत. दर दिवशी या उड्डाणपूलावरून सरासरी ६० हजार वाहने प्रवास करत आहेत. मालाड, लिंक रोडहून मालवणी येथे वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंक रोड, विशेषतः मीठ चौकी सिग्नलवरील वाहतुकीमुळे तासनतास ताटकळत राहावे लागत होते. परंतु उड्डाणपुलामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

मालाडमध्ये पूर्व पश्चिम विभागांना जोडण्यासाठी मीठ चौकी पूल मुंबई महापालिकेने उभारला आहे. मालाड पश्चिमेला असलेल्या मीठ चौकी जंक्शनवर टी आकाराच उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मार्वेकडून मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाता येणार आहे.

मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एक मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी दुसरी मार्गिका अशी उड्डाणपुलाची रचना आहे. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका ६ ऑक्टोबर २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. गोरेगावकडे जाणारी मार्गिका जानेवारी महिन्यापासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी जानेवारी महिन्यात मीठ चौकी उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा मालाडकरांसाठी खुला केला. वाहतूक कोंडीची समस्या सुटल्यामुळे नागरिकांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा झाली आहे, अशी प्रतिक्रिया गोयल यांनी व्यक्त केली आहे.

मीठ चौकी उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे पश्चिम उपनगरातील सुमारे दोन ते तीन लाख प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. मीठ चौकी उड्डाणपुलामुळे इंधनाची बचत आणि प्रवाशांचा वेळ वाचू लागला आहे. तसेच मढ गाव, मालवणी येथील लोकांना मुंबई उपनगरात लवकरात लवकर पोहोचणे शक्य झाले आहे. मीठ चौकी उड्डाणपुलावरून दरदिवशी सुमारे ६० हजार वाहने धावतात, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.

मढ-मालवणी ते मालाड स्थानक आणि मीठ चौकी ते गोरेगाव अशा रस्त्यांना मीठ चौकी सिग्नल जोडला गेला आहे. मढ, भाटी, एरंगळ, आक्सा, मार्वे, मालवणी चर्च, रातोडी, खारोडी, संपूर्ण मालवणी मध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागत होते. मीठ चौकी सिग्नलचा ‘पॅसेंजर कार युनिट’ (पीसीयू) हा दहा हजाराच्या वर गेला होता. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

आता दोन ते तीन मिनिटात मीठ चौकी सिग्नल पार करून मालाड स्थानकाकडे रवाना होता येते. मालवणी एक नंबरवरून ते मालाड स्थानकापर्यंत जाण्यासाठी दीड तास लागत होता. मालाडकरवासीयांसाठी उड्डाणपुल सुरू केल्यामुळे १५ मिनिटांत मालाड स्थानकापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. सद्यस्थितीला पूर्वीसारखी मीठ चौकी सिग्नल येथे वाहतूक कोंडी होत नाही, अशीही प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

अवजड वाहनांना मनाई मीठ चौकी उड्डाणपुलावरून दुचाकीपासून ते रुग्णवाहिकांपर्यंतच्या वाहनांना प्रवास करण्यास परवानगी आहे. तसेच अवजड वाहनांना या उड्डाणपुलावरून प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एखादे अवजड वाहन पुलावरून प्रवास करताना आढळून आल्यावर त्यावर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत.

Story img Loader