मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचा (आयआयटी, मुंबई) ६२ वा दीक्षांत समारंभ व विभागीय पदवी पुरस्कार सोहळा २४ व २५ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस पार पडला. यावेळी २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात ३०१९ विद्यार्थ्यांना एकूण ३३०३ पदव्या देण्यात आल्या, त्यात ४९८ पीएचडी पदव्यांचा समावेश आहे. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीश केदारे यांनी पदवी व पदक प्राप्त विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा >>> संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत
६२ व्या दीक्षांत समारंभाच्या विभागीय पदवी पुरस्कार सोहळाच्या अध्यक्षस्थानी आयआयटी मुंबईतील विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक होते. यावेळी राष्ट्रपती सुवर्ण पदकाने संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील बी.टेकचा विद्यार्थी वेदांग धीरेंद्र आसगावकर याला गौरवण्यात आले. तसेच डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील बीटेक विद्यार्थी कैवल्य संजय डागा याला प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्ण आणि रौप्य पदके प्रदान करण्यात आली.
हेही वाचा >>> ‘जीएसबी’च्या गणेशोत्सवासाठी ४००.५८ कोटींचे विमा संरक्षण
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ६७४ विद्यार्थिनी आणि २३४५ विद्यार्थ्यांसह एकूण ३०१९ विद्यार्थ्यांना ३३०९ पदवी प्रदान करण्यात आल्या. २०२३-२४ मध्ये देण्यात आलेल्या एकूण ४९८ पीएचडी पदव्यांमध्ये १९१ विद्यार्थिनी आणि ३०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांमध्ये ९५१ बीटेक पदवींबरोबरच ३५८ बीटेक व एमटेक अशा दुहेरी पदवी आणि १०० आंतरविद्याशाखीय दुहेरी पदवी, चार वर्षीय बॅचलर ऑफ सायन्सच्या ६४ पदवी, बीएस व एमएस्सीच्या १० दुहेरी पदवी, बॅचलर ऑफ डिझाईनच्या २० पदवींबरोबरच १८ दुहेरी पदवी आणि तीन वर्षीय बॅचलर ऑफ सायन्सच्या ३१ पदवी प्रदान करण्यात आल्या. एमटेकमध्ये ६३५ पदवी प्रदान करण्यात आल्या. मास्टर ऑफ सायन्सच्या ४६, त्याचप्रमाणे एमटेक, एमएस्सी व एमएस असा दुहेरी पदवी ४ जणांना देण्यात आली. तसेच मास्टर इन डिझाइन ६९, दोन-वर्षीय एमएस्सी २९० पदवी, एमबीए ११० आदी पदव्या प्रदान करण्यात आल्या.