मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या ६४ टक्के पाणी साठा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना पडला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस पडला होता. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सुमारे ९५ टक्क्यांवर गेला होता. मात्र तरीही यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच मुंबईच्या विविध भागात पाणी टंचाई जाणवत आहे. विविध मतदारसंघातील आमदार पाणी प्रश्नासाठी पालिका आयुक्तांची भेट घेत आहेत.
हेही वाचा…मुलुंडमधील पक्षी उद्यान प्रकल्पाला यावर्षी वेग येणार
शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऑक्टोबर महिन्यात शिवडीमध्ये हंडा मोर्चा काढला होता. त्याआधी वरळी, लोअर परळ भागात पाणी टंचाई होती. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिंडोशीतील ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. तर गेल्याच आठवड्यात आमदार आदित्य ठाकरे यांनीही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येते, कधी दूषित पाणी येते तर कधी कमी पाणीपुरवठा होतो अशा तक्रारी असल्याचे त्यांनी यावेळी आयुक्तांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून खार, सांताक्रूझ, वांद्रे परिसरातही ट्रॅंकरने पाणी आणावे लागत असल्याच्या तक्रारी विभाग कार्यालयात आल्या होत्या. तर दोनच दिवसांपूर्वी जोगेश्वरी पूर्वचे आमदार अनंत नर यांनीही पालिका आयुक्तांची भेट घेऊन पाण्यासंदर्भात निवेदन दिले. जोगेश्वरी पूर्वेकडील बांद्रेकर वाडी, मेघवाडी, शामनगर, आघाडीनगर या भागात प्रचंड पाणी टंचाई असल्याचे त्यांनी यावेळी आयुक्तांना सांगितले. तसेच या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या वेरावली जलाशयाबरोबरच आणखी एक अतिरिक्त जलाशय बांधावे, अशीही मागणी त्यांनी केली.
हेही वाचा…मॅरेथॉनच्या मार्गावर प्रदूषणाची पातळी मोजणार, आठ एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाइल व्हॅन तैनात
धरणात पाणी असूनही पाणी टंचाई का ?
धरणात पाणी असूनही मुंबईच्या अनेक भागात पाणी टंचाई का आहे, असा सवाल आमदार नर यांनी उपस्थित केला आहे. पालिका प्रशासनाने अघोषित पाणी कपात लागू केली आहे. एखाद्या ठिकाणची तक्रार केली की तिथला पाणीपुरवठा सुरळीत होतो व दुसरीकडे पाणी टंचाई निर्माण होते. जल अभियंता विभागातील अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे आयुक्तांपर्यंत जावे लागते. पश्चिम उपनगरातील लोकसंख्या वाढत असून पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे जोगेश्वरीसाठी अतिरिक्त जलाशय बांधण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.