हीमयुगातील मुंबई

मुंबईमध्ये दोन थरांमध्ये जिवाश्म सापडतात.  यातील पहिल्या थरातील जिवाश्म ही मलबार हिल, वरळी, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी या भूभागामध्ये सापडतात. त्यात तीन प्रकारचे मासे, बेडूक, कासव आणि पाण्यामधील वनस्पतींचा समावेश आहे. हे झाले पहिले मुंबईकर, ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे! 

मादागास्कर बेटांजवळून पुढे सरकताना इंडियन प्लेटवर उफाळून आलेल्या महाज्वालामुखींनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती केली. भूगर्भातील त्या हालचाली- उलथापालथी या दीर्घकाळ सुरूच होत्या. मुंबई परिसरातील काही ज्वालामुखी हे ज्वालामुखीच्या पहिल्या महास्फोटानंतर काही हजार वर्षांनी लगेचच (काही हजार वर्षे हा भूगर्भीय भाषेत फारच छोटा कालखंड असल्याने इथे लगेचच असे म्हटले आहे) जागृत झाले, असे भूगर्भतज्ज्ञांना लक्षात आले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या ज्वालामुखींच्या वेळेस या भूस्तरावर असलेले काही प्राणी जिवाश्मामध्ये रूपांतरीत झाले. त्या वेळेस भूगर्भामध्ये होणाऱ्या अकस्मात हालचालींमध्ये काही गोष्टी गाडल्या जातात तेव्हा त्यांच्यावर असलेला विशिष्ट दाब व अकस्मात घटना त्यांचे विघटन होऊ  देत नाही. मग अशा वेळेस त्यांच्या जैविक पेशी या मृतावस्थेत जाऊन कालौघात त्या पेशींची जागा दगड घेतो आणि अशा प्रकारे जिवाश्म जन्माला येते. या जिवाश्मामध्ये त्या प्राणी किंवा झाडाचा मूळ आकार कायम राहातो आणि किंबहुना म्हणूनच आपण ते ओळखू शकतो. त्यावरून ओळख पटली पहिल्या मुंबईकरांची!

कोण होते हे पहिले मुंबईकर, या प्रश्नाचा शोध घेताना डॉ. रोहिंग्टन आवासिया यांना असे लक्षात आले की, मुंबईमध्ये दोन थरांमध्ये आपल्याला जिवाश्म सापडतात. यातील पहिला जुना थर हा ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असून दुसरा थर हा त्यानंतरच्या हजार वर्षांनंतरचा आहे. पहिल्या थरातील जिवाश्म ही मलबार हिल, वरळी, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी या भूभागामध्ये सापडतात. त्यात तीन प्रकारचे मासे, बेडूक, कासव आणि पाण्यामधील वनस्पतींचा समावेश आहे. हे झाले पहिले मुंबईकर, ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे!

दुसरा लाव्हा थर हा हजार वर्षांनंतरचा आहे. हा थर प्रामुख्याने मालाड, मनोरी आणि उत्तन परिसरांमध्ये पाहायला मिळतो. नंतरच्या कालखंडातील ज्वालामुखींमधून आलेल्या या लाव्हाखालीही काही प्राणी गाडले गेले. सेंट झेवियर्स महाविद्यालयातील भूगर्भतज्ज्ञ डॉ. रतन सुकेशवाला यांना भाईंदर येथे खाडीच्या आतमध्ये येणाऱ्या भागामध्ये माशाचे जिवाश्म सापडले होते. भाईंदरच्या या परिसरामध्ये आणखीही काही जिवाश्मे सापडली आहेत.

हिमयुगही अनुभवले मुंबईने

सुमारे दहा लाख वर्षांनंतर पृथ्वीवरील वातावरणात महत्त्वाचे मोठे बदल होतात. थंडी वाढत जाऊन हिमयुग अवतरते आणि मग दहा लाख वर्षांनी पुन्हा उष्णता वाढत जाऊन पाण्याची पातळी वाढत जाते. हे असे अव्याहत चक्र मुंबईनेही अनुभवले आहे. त्याचे पुरावे आजही मुंबईच्या भूगर्भीय रचनेमध्ये खास करून किनारपट्टीच्या भागात पाहायला मिळतात. कारण पाण्याच्या वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या पातळीचा पहिला संबंध हा किनारपट्टीशी येतो. गेले हिमयुग अशा प्रकारे दहा लाख वर्षांपूर्वी येऊन गेले. त्या हिमयुगाच्या कालखंडामध्ये समुद्राचे पाणी बर्फ झाले आणि उत्तरेच्या दिशेने एकवटले गेले. साहजिकच होते की त्यामुळे मुंबई किनाऱ्याची पातळी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर खाली गेली आणि एरवी समुद्राखाली असलेला जमिनीचा खूपच मोठा भाग उघडा पडला. हे फक्त मुंबईपुरते मर्यादित नव्हते. तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या भोवती हाच अनुभव आला.

अशाच प्रकारची घटना सुमारे ३५ हजार वर्षांपूर्वीही घडली आणि मुंबईच्या समुद्राची पातळी खूप खाली गेली. कालौघात दीर्घकाळ जमीन उघडीच राहिल्याने त्यावर एकेशियाचे (बाभूळाच्या जातीतील वनस्पती) जंगल तयार झाले. काही वर्षांनंतर हे जंगल सुस्थितीत असतानाच अचानक पुन्हा झालेल्या बदलांनी या मुंबईच्या संपूर्ण जंगलाला जलसमाधीच मिळाली. हे जलसमाधीस्थ जंगल आजही मुंबईच्या किनाऱ्यावर तसेच उभे आहे. ती झाडे अद्याप उभ्या अवस्थेतच आहेत. हे कसे काय घडले?

ज्याप्रमाणे जिवाश्म तयार होताना पृथ्वीच्या पोटात घडलेल्या उलथापालथींनी अचानक ऑक्सिजन न मिळाल्याने विघटन थांबते त्याचप्रमाणे इथेही समुद्रातील गाळ व चिखळाच्या थराखाली हे जंगल दबले गेले. त्यामुळे कालौघात त्यातील पेशी नष्ट झाल्या तरी त्याचा आकार कायम राहिला. त्यामुळे हे जंगल आजही भूगर्भात जसेच्या तसे उभे असून पाण्याखाली गेले आहे. माझगाव गोदीमध्ये गेल्या शतकात सुक्या गोदीचे काम सुरू असताना त्याच्यासाठी केलेल्या खणकामामध्ये या जंगलाचे अस्तित्व लक्षात आले आणि त्याचे अवशेष सापडले. मात्र ते अवशेष आज नेमके कुठे आहेत, याचा शोध आजही अपुराच आहे.

विनायक परब  @vinayakparab

vinayak.parab@expressindia.com