रस्त्यांवरील वाढती वाहतूक, धोकादायक वळणे आणि प्रवाशांची घटती संख्या विचारात घेता अतिशय गैरसोयीच्या असूनही ६५ आसन क्षमतेच्या बस गाडय़ा चालविण्याचा प्रशासनाचा हट्टीपणाही या भीषण अपघातास कारणीभूत असल्याचे एसटीतील सूत्रांचे म्हणणे आहे. द्रुतगती मार्गावरून या गाडय़ा चालविणे सोयीचे असले तरी माळशेजसारख्या घाटात या गाडय़ा सोडणे म्हणजे अपघातास थेट निमंत्रण देण्यासारखेच असल्याचा चालकांचा अनुभव आहे. त्यामुळेच देशातील अनेक परिवहन मंडळांनी ६५ आसनी गाडय़ा नाकारल्या आहेत. राज्य परिवहन उपक्रमातील अनेक चालकांचाही या गाडय़ांना विरोध आहे. त्यांनी वेळोवेळी याविषयी आपले अभिप्राय वरिष्ठांना कळविले
आहेत. ठाण्यातील चालकांनीही ‘या गाडय़ा नको’ अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यांची सूचना फारशी गांभीर्याने न घेता मोठय़ा गाडय़ा ठाण्याच्या विविध आगरांमधून सोडल्या जातात. एसटी वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे विभागात ६५ आसन क्षमतेच्या एकूण ६१ गाडय़ा आहेत. सर्वसाधारण एसटी गाडीच्या तुलनेत या ६५ आसनी क्षमतेच्या गाडय़ांना जास्त डिझेल लागते. सर्वसाधारण एसटी गाडी दहा लिटर्स डिझेलमध्ये ४५ किलोमिटर चालते, तर तेवढय़ाच इंधनात ६५ आसनी गाडी केवळ ३४ ते ३५ किलोमिटर अंतर कापून जाते. शिवाय खर्चाच्या तुलनेत या गाडीतून प्रशासनास फारसे उत्पन्नही नाही. या अपघातग्रस्त गाडीतही एकूण क्षमतेच्या निम्मेच म्हणजे ३६ प्रवासी होते. त्यामुळे सुरक्षितता आणि व्यवहारिकदृष्टय़ा अत्यंत गैरसोयीचे ठरलेले हे ६५ आसनी गाडय़ांचे पांढरे हत्ती पोसणे एसटी प्रशासनाने बंद करावे, अशी कळकळीची भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा