मुंबई : प्राथमिक बाजारात खुल्या समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूकीतून ३०० ते ६०० टक्के नफा करून देण्याचे आमिष दाखवून ६५ वर्षीय सनदी लेखापालाची (चार्टर्ड अकाउंटंट) अडीच कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. दादरमधील रहिवासी असलेल्या सनदी लेखापालाच्या तक्रारीवरून मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी इन्स्टिट्युशनल डिमॅट खाते उघडण्याच्या नावाखाली बनावट ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून तक्रारादाराची फसवणूक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रारदार दादर येथील रहिवासी असलेले तक्रारदार कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेशी संंबधित व्यावसायिक आहेत. तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारीला तक्रारदार सनदी लेखापालाने युट्युबवर शेअर मार्केट ट्रेडिंगशी संबंधित जाहिरात पाहिली होती. चित्रफितीखाली असलेल्या दुव्यावर (लिंक) गेल्यानंतर ते करनवीर प्रॅक्टीस नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाले. त्या ग्रुपमध्ये सुनील सिंघानिया नावाने एक व्यक्ती समभाग खरेदी विक्रीबाबत माहिती द्यायची. मार्च महिन्यात त्या व्यक्तीने त्यांना अॅलिसएक्सए नावाची लिंक पाठवली व इन्स्टिट्यूशनल डिमॅट खाते उघडण्यास सांगितले. त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर डिमॅट खाते उघडण्याबाबत कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांना लिंक पाठवून अॅलिस नावाचे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. तक्रारदार यांनी सुरूवातीला केवळ पाच हजार रुपये ॲपमध्ये भरले. जमा पैशांमध्ये ते दिसल्यानंतर तक्रारदाराला विश्वास बसला. त्यांनी ४५ हजार रुपये भरले. त्यावेळी त्याांना खात्यात ५० हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यानंतर तक्रारदारांनी वेगवेगळ्या आयपीओसाठी सुमारे ६६ लाख १७ हजार रुपये खात्यात जमा केले.
हेही वाचा >>>अकरावी प्रवेश प्रक्रिया : तिसरी प्रवेश यादी जाहीर, १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय
पण आयपीओ १८ दिवस विकू शकत नसल्याचे दिसत होते. त्यानंतर तक्रारदार यांना एप्रिल महिन्यात वोडाफोनचा सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (एफपीओ) आला असून आम्ही कमी दरात देत असल्याचे सुनील सिंघानिया नावाच्या व्यक्तीने सांगितले. तसेच त्यातून ३०० ते ६०० टक्के नफा होणार असल्याचे आमिष आरोपीने तक्रारदाराला दाखवले. त्यानुसार तक्रारदाराने आणखी रक्कम खात्यात जमा केली. मे महिन्यात तक्रारदाराने आयपीओमधील सर्व शेअर्स विकले. त्यावेळी त्यांना सात कोटी ४० लाख २५ हजार रुपये नफा झाल्याचे अॅलिस या अॅपमध्ये दाखवत होते. काही दिवसांनी तक्रारदार यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पण ती रक्कम त्यांना काढता आली नाही. त्यांनी संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदाराने या अॅपद्वारे दोन कोटी ५१ लाख रुपये विविध बँक खात्यात जमा केले होते. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी नुकताच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.