मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पुजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेवरून ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी सामावून घेण्यासाठी रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र जमतात. सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक परराज्यातील घरी जातात. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने अगोदरच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने यावर्षी सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने ४,४२९ उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या होत्या. तर, यावर्षी भारतीय रेल्वेने ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३४६ विशेष गाड्या चालवत आहेत. तर, पश्चिम रेल्वेवरून १०६ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने मुंबई व पुणे येथून दानापूर, गोरखपूर, बनारस, समस्तीपूर, प्रयागराज, हजरत निजामुद्दीन येथे जाण्यासाठी अनेक रेल्वेगाड्या जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा >>>Ratan Tata : रतन टाटांना अखेरचा निरोप देताना भाऊ जिमी टाटांना अश्रू अनावर, सावलीसारखा भाऊ हरपल्याचं मनात दुःख
सणासुदीच्या काळात प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण २,३१५ फेऱ्यांसह १०६ विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत या ठिकाणांसाठी चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वे मुंबईतून देशाच्या विविध भागांमध्ये जाण्यासाठी १४ रेल्वेगाड्या चालवत आहे. तसेच, त्याचप्रमाणे गुजरातमधील सुरत, उधना, वापी, वलसाड, वडोदरा, अहमदाबाद, साबरमती, हापा, ओखा, राजकोट, भावनगर टर्मिनस आणि मध्य प्रदेशातील इंदोर, डॉ. आंबेडकर नगर, उज्जैन येथूनही विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.