मुंबई : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात एल. टी. मार्ग पोलिसांना यश आले. ॲश्वर्ड विल्सन असे आरोपीचे नाव असून व्यापाऱ्याकडील ६६ लाख ७९ हजाराची रोख घेऊन तो पळून गेला होता. आरोपीने इतरांचीही फसवणूक केल्याचा संशय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार आर. प्रदीपकुमार हे मूळचे कर्नाटकमधील रहिवासी असून त्यांचा सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. २०१९ मध्ये वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत असताना त्यांची ओळख उज्ज्वल डुगलबरोबर झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वी उज्जवलने त्यांना दूरध्वनी करून काही सोन्याच्या छोट्या लगडचे छायाचित्र पाठविले. तसेच त्याला सोने हवे आहे का ? अशी विचारणा केली. तसेच स्वस्तात सोने देण्याची तयारीही दर्शविली. त्यामुळे त्यांनी त्याला होकार कळवला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना ॲश्वर्डचा मोबाइल क्रमांक दिला. झव्हेरी बाजारमधील मोठमोठ्या बुलियन कंपन्यासाठी ॲश्वर्ड दलाल म्हणून काम करतो, त्याच्याकडे सव्वाकिलो शुद्ध सोन्याचे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे १२ लगड आहेत, तो स्वस्तात लगड देईल असे त्याने सांगितले. त्यामुळे त्यांनी ॲश्वर्डबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी काळ्या बाजारातील सोन्याच्या विक्रीमुळे कोणाताही कर लागत नाही, असे त्याने सांगितले. १ किलो २०० ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्यासाठी ६७ लाख रुपये द्यावे लागतील, असे ॲश्वर्डने त्यांना सांगितले.

हेही वाचा : छायाचित्रांतून अटल सेतूचे दर्शन

आर. प्रदीपकुमार ठरल्याप्रमाणे जानेवारी महिन्यांत मुंबईत आले. मुंबादेवी मंदिराजवळ त्यांना ॲश्वर्ड भेटला. तिथे त्याने त्याच्याकडील शुद्ध सोन्याचा नमुना त्यांना दाखवला. तपासणीत ते सोने खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याने १२०० ग्रॅम वजनाची सोन्याची १२ बिस्कीटे देण्याची तयारी दर्शवत आर. प्रदीपकुमार यांच्याकडून रोख ६६ लाख ७९ हजार रुपये घेतले. त्यानंतर तो त्यांना घेऊन एका कार्यालयाबाहेर आला. पैसे घेतल्यानंतर सोन्याची लगड घेऊन येतो सांगून ॲश्वर्ड तेथून निघून गेला आणि परत आलाच नाही. त्याला दूरध्वनी केला असता त्याचा मोबाइल बंद होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच आर. प्रदीपकुमार यांनी उज्ज्वलला याबाबत माहिती दिली. ॲश्वर्ड आपला मित्र असून त्याच्याकडून फसवणूक होणार नाही असे त्याने आर. प्रदीपकुमार यांना सांगितले. त्यानंतर उज्ज्वलने आरोपीच्या नातेवाईकाचा मोबाइल क्रमांक त्यांना दिला. आर. प्रदीपकुमार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ॲश्वर्डने त्यांनाही आठ लाखांना फसवल्याचे समजले. अखेर जुलै महिन्यात प्रदीपकुमार यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता ॲश्वर्ड पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पुण्यातून आरोपीला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 66 lakh rupees fraud case accused arrested from pune mumbai print news css