राज्यातील ६६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. बुधवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांची यादी जाहीर केली. परंतु त्यापैकी मुंबईतील २६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती देऊन मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. यापूर्वीच मुंबईतील ५० पोलीस अधिकाऱ्यांची राज्यातील अन्य ठिकाणी बदली केल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे.
पोलीस दलातील सगळ्यांच्या नजरा लागून असलेल्या बदल्या आणि बढत्यांची तिसरी यादी बुधवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात एकूण ६६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. परंतु या यादीतील २६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती देऊन मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. ज्यांचा सेवाकाळ एक वर्षांपेक्षा कमी आहे त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मुंबईतच बढती देण्यात आली आहे.
या बदल्यांबाबत पोलीस दलात असंतोष कायम आहे. मागील बदल्यांच्या यादीत २७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. तर २२ पोलीस निरीक्षकांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. त्यामुळे अनेक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबईबाहेर बदल्या आणि बढत्या केल्यामुळे जवळपास ७५ पोलीस अधिकारी मुंबईबाहेर गेले आहेत.
आमच्या अनुभवाचा वापर शहरासाठी करायची वेळ आली होती. परंतु निवृत्तीच्या टप्प्यात शहराबाहेर बदली करण्यात आल्याची खंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
६६ पोलिसांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती
राज्यातील ६६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. बुधवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांची यादी जाहीर केली.
First published on: 11-06-2015 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 66 police officers get promotion