मुंबई : मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी अशा सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचा संकल्प सोडला असून या प्रकल्पाच्या कामाला कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण प्रकल्पाचे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी या प्रकल्पातील आव्हानात्मक अशा दोन समांतर बोगद्यापैकी दुसऱ्या बोगद्याचे कामही वेगात सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा, नरिमन पॉइंट परिसरातून झटपट उपनगरात पोहचता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने सागरी किनारा रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचा सागरी किनारा मार्ग मुंबई महानगरपालिका बांधत आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पातील अंत्यत महत्त्वाचा असा हा प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सागरी किनारा मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.
या प्रकल्पातील एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. या प्रकल्पात पॅकेज ४ मध्ये दोन समांतर बोगदे बांधण्यात येत आहेत. प्रिय दर्शनी पार्क – छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किमी अंतराचे अशा समांतर दोन बोगद्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. यापैकी एका, मरिन ड्राईव्हच्या दिशेचा बोगदा जानेवारी २०२२ ला पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम वेगात सुरू आहे.