मुंबई : मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ६७२ झोपड्या, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्याची धडक कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागाने तीन दिवसात पार पाडली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर करणे शक्य होणार आहे. मात्र ही बांधकामे हटवल्यामुळे मिठी नदी सुधारणेसाठीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे, पण आजूबाजूच्या परिसरात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.
मुंबईत २००५ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा अनधिकृत बांधकामांमुळे मिठी नदीचे पात्र अरुंद झाल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे मिठी नदी विकास प्राधिकरण स्थापन करून नदीच्या रुंदीकरणाचा व सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र अनधिकृत बांधकामे हटवण्यास विलंब होत होता. विहार तलावापासून ते माहीम खाडीपर्यंत नदीचा विस्तार असून ही नदी अंधेरी, कुर्ला, वांद्रे या परिसरातून वाहत येते. या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे, अनधिकृत बांधकामे असल्यामुळे टप्प्याटप्प्याने ती हटवण्यात येत आहेत. याअंतर्गत एच पूर्व विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करून बांधकामे हटवली.
हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर, २ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार
मिठी नदीच्या पात्रात किंवा पात्रालगतची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या वतीने २९ फेब्रुवारी आणि १ मार्चदरम्यान धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत ६७२ झोपड्या, तसेच अन्य बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला आहे. आता या संपूर्ण परिसरामध्ये मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल. तसेच मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल, अशी माहिती एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी दिली.
बांधकामांची पात्रता-अपात्रता निश्चित करून पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई पार पाडण्यात आल्यामुळे मिठी नदी सुशोभिकरण प्रकल्पाला आता वेग मिळू शकणार आहे. तसेच कुर्ला, वाकोला परिसरात पावसाळ्यात मिठी नदीचे पाणी शिरल्यामुळे जी पूरस्थिती निर्माण होत होती ती देखील कमी होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.