मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ रहिवाशी २००८ पासून बेघर असून त्यांना मागील १७ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. मात्र आता त्यांची १७ वर्षांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. कारण या ६७२ मूळ रहिवाशांसाठीच्या पुनर्वसित इमारतींना नुकतीच म्हाडाकडून निवासी दाखला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता या रहिवाशांना घरांचे वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार लवकरच एका सोहळ्यात ६७२ मूळ रहिवाशांना घराचे वितरण केले जाणार आहे.
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत येथील ६७२ मूळ भाडेकरूंची घरे २००८ मध्ये रिकामी करुन घेत पुनर्विकासाला सुरुवात करण्यात आली. मात्र मूळ विकासकांनी पुनर्विकास अर्धवट सोडला आणि पुनर्विकासात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. या गैरव्यहाराविरोधात राज्य सरकारकडून विकासकाविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे हा प्रकल्प विकासकाकडून काढून घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा प्रकल्प मंडळाकडे आल्यानंतर मंडळाने ६७२ घरांचा समावेश असलेल्या पुनर्वसित इमारतीसह ३०५ घरांचा समावेश असलेल्या सोडतीतील घरांच्या इमारतीच्या कामाला २०२२मध्ये सुरुवात केली. ही कामे नुकतीच पूर्ण करत मंडळाने पुनर्वसित आणि सोडतीतील इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यानुसार जानेवारीत सोडतीतील ३०५ घरांचा समावेश असलेल्या इमारतीला निवासी दाखला प्राप्त झाला. त्यानुसार मुंबई मंडळाच्या पणन विभागाकडून ३०५ विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र वितरीत करत त्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर आता पत्राचाळीतील मूळ रहिवाशांचीही हक्काच्या घराची १७ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. विकासकाने प्रकल्प अर्धवट सोडत बेघर केल्याने, घर भाडे देणे बंद केल्याने आणि प्रकल्पात मोठा गैरव्यवहार केल्याने आपण हक्काच्या घरात जाऊ कि नाही असा प्रश्न काही वर्षांपूर्वी या रहिवाशांसमोर होता. मात्र प्रकल्प मुंबई मंडळाच्या ताब्यात गेल्यानंतर आणि मंडळाने पुनर्वसित इमारतींच्या कामास सुरुवात केल्यानंतर रहिवाशांना दिलासा मिळाला. तर आता मंडळाने इमारतीचे बांधकाम पूर्ण करत निवासी दाखलाही प्राप्त करुन घेतला आहे.
गेल्या आठवड्यात पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निवासी दाखला मिळाल्याने आता मूळ रहिवाशांना घरांचे वितरण करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान पत्राचाळीतील ६७२ रहिवाशांना भव्य कार्यक्रमात घरे वितरीत केली जाण्याची शक्यता आहे. कारण म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात या घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. तेव्हा लवकरच म्हाडाकडून या ६७२ घरांच्या वितरणासंबंधीचा घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र रहिवाशांची १७ वर्षांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपुष्टात आल्याने ही बाब या रहिवाशांसाठी दिलासादायक असणार आहे.