मुंबई : पश्चिम रेल्वेवर रेल्वे सुरक्षा दलाकडून ‘प्रवासी सुरक्षा’ मोहीम राबवली जात आहे. मोहिमेद्वारे या वर्षांच्या सुरुवातीपासून २० सप्टेंबपर्यंत विविध प्रकरणात ६७४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयित हालचालींवर पाळत ठेवून, गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आणली.
गर्दीच्या स्थानकांतील प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी चार प्रकारांतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांची स्पष्टता, चित्रीकरण करण्याची क्षमता यावरून हे प्रकार पडले आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या ३,८५७ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामधील चेहरा ओळख प्रणाली (एफआरएस)चे ४८८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, रंग, स्वभाव आणि वस्तूच्या रचना टिपल्या जातात. या सर्व बाबींचा दस्ताऐवज तयार होतो. त्याद्वारे त्या व्यक्ती, वस्तूचा शोध घेणे शक्य होते. या प्रणालींमध्ये ज्ञात गुन्हेगारांचा, प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा ‘प्रवासी सुरक्षा’ मोहिमेद्वारे शोध घेतला जातो, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.