मुंबई : पर्यटन संचालनालयाच्या बँक खात्यातून ६८ लाख रुपये इतर बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्यटन संचालनालयाचे मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणूक, तोतयागिरी व बनावट धनादेश बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली असून त्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्य लेखा अधिकारी विठ्ठल सुडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधी पर्यटन संचालनालयाच्या बँक खात्यातून १५ विविध बनावट धनादेशाद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रीयकृत बँकेच्या नरिमन पॉईंट येथील मंत्रालयीन शाखेतील चालू बँक खाते आहे. त्यातून ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आली आहे. याप्रकरणी आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल व आनंदा मंडल यांच्या विरोधात फसवणूक, तोतयागिरी व बनावट धनादेश बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश डेच्या बँक खात्यावर २२ लाख ७९ हजार रुपये, तपन मंडल याच्या बँक खात्यावर २२ लाख ७३ हजार रुपये, पाल हिच्या बँक खात्यावर १३ लाख ९१ हजार रुपये व आनंदा याच्या बँक खात्यावर ९ लाख २४ हजार रुपये हस्तांतरित झाल्याचे बँकेकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे. एकूण ६८ लाख ६७ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले असून त्यासाठी १५ धनादेशांचा वापर करण्यात आला आहे. ते बनावट असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>मुलुंडमधील प्रकल्पग्रस्तांच्या घर बांधणी प्रकल्पाविरोधात घंटानाद आंदोलन
परराज्यातील बँक खात्यात रक्कम हस्तांतरित
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली सर्व बँक खाती परराज्यातील आहेत. आरोपींनी बनावट धनादेश तयार केले आहेत. रक्कम हस्तांतरित करण्यात आलेले सर्व धनादेश पर्यटन संचालनालयाकडे आहेत. त्यामुळे याप्रकरणामागे सराईत टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.