मात्र विकासकामांसाठी निधी अपुरा, जुन्या योजनांवरच भर
राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि देशभर मंदीचे वातावरण असतानाही ७.१ टक्के विकासदराचे उद्दिष्ट गाठण्याचा आशावाद अर्थमंत्री अजित पवार यांनी २०१३-१४च्या अर्थसंकल्पातून बाळगला आहे.
राज्यात गुंतवणूक वाढावी, यासाठी नवीन उद्योगांना सवलती देण्याबरोबरच पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद केली आहे. मात्र विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे दिसून आल्याने नव्या योजनांची जंत्री लावण्यापेक्षा जुन्या योजनांच्या पूर्तीवरच अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
मंदीतही राज्याच्या महसुली उत्पन्नात वाढ होत असून मार्च २०१२मध्ये अर्थसंकल्प सादर करताना १३६ हजार ७११ कोटी ७० लाख महसूल जमा होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात उत्पन्न वाढले असून १४४ हजार ६२२ कोटी ७० लाख रुपये महसूल मिळाला आहे. त्यामुळे २०१३-१४ या वर्षांत १ लाख ५५ हजार ९८६ कोटी ९५ लाख रुपये महसूल मिळेल, असा अंदाज आहे; तर खर्च एक लाख ५५ हजार ८०२ कोटी ५७ लाख रुपये अपेक्षित असून १८४ कोटी ३८ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. राज्याची वार्षिक योजना ४६ हजार ९३८ कोटी रुपयांची असून त्यापैकी कृषीअंतर्गत ठिबक सिंचन योजना, जलसंधारण, जलसंपदा आदी कामांसाठी सुमारे ८३८० कोटी रुपयांची म्हणजे सुमारे २५ टक्के तरतूद करण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी ३३७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सामान्य सेवांसाठी २१११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राजकोषीय तूट महसुलाच्या तुलनेत ३ टक्क्य़ांच्या आत राखणे बंधनकारक आहे. त्यासाठी वित्तीय शिस्त राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुढील वर्षांत राजकोषीय तूट २४११८ कोटी रुपये अपेक्षित असून ती स्थूल उत्पन्नाच्या १.६ टक्के इतकी आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यभर लागू करताना त्यासाठी आर्थिक तरतूद मात्र केवळ ३२५ कोटी रुपयांची करण्यात आली आहे. पगार, निवृत्तिवेतन व कर्जावरील व्याजावर उत्पन्नाच्या ६२.७७ टक्के रक्कम खर्ची पडत असल्याने विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या योजनांची घोषणा करण्यापेक्षा सुरू असलेल्या योजना पूर्ण करण्यावरच भर देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा