पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ कोटी रूपये खर्च करण्याच्या निर्णयास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
माळीण गावावर दरड कोसळून अनेक कुटुंबे बाधित झाली होती. या दुर्घटनेत मोठी प्राणहानीही झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ३० कुटुंबांना प्रत्येकी एक लाख खर्च करून तात्पुरते शेडचे बांधकाम, ७२ कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये खर्चून पक्की घरकुले, प्रति एकर चार लाख रुपये या दराने ८ एकर जमिनीची खरेदी, तसेच नागरी सुविधांसाठी पाच कोटी रुपये याप्रमाणे खर्च होणार आहे.
याशिवाय गावामध्ये स्मृती भवन, स्मृती स्तंभ, कुंपणाची भिंत व समाज मंदिर यासाठी लागणारा एक कोटींचा खर्च हा आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या कामासाठी जिल्हाधिकाऱयांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यात उद्भवू शकणाऱ्या आकस्मिक बाबींचा विचार करता खर्चाची कमाल मर्यादा १० कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही कामे एका वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा