सांताक्रूझ येथील यशवंत नगरमधील ‘शंकरलोक’ इमारत दुर्घटनाप्रकरणी विकासक आणि इमारतीमध्ये तळ ठोकून बसलेल्या रहिवाशांविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मात्र विकासक आणि संबंधित रहिवाशी कुंदा श्रीधरन फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘शंकरलोक’ ही सात मजली इमारत पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली होती. या इमारतीची स्थिती चांगली असून ती विकासकाच्या घशात घालण्याचा डाव असल्याची आरोप करीत रहिवाशी कुंदा श्रीधरन यांनी न्यायालयात धाव घेत इमारत पाडण्यास स्थगिती मिळवली होती. इतर रहिवाशांनी मात्र आपली घरे रिकामी करून अन्यत्र स्थलांतर केले होते. केवळ श्रीधरन कुटुंब आणि अन्य एक व्यक्ती इमारतीमध्ये राहात होते. या इमारतीवरील पाण्याची टाकी शुक्रवारी शेजारच्या चाळीवर कोसळली आणि श्रीधरन यांची बहीण सुधासह सातजण ठार झाले.
या प्रकरणी पोलिसांनी विकासक आणि रहिवाशी कुंदा श्रीनिवास आणि अन्य काहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बदलापुरात एकाची गोळी घालून हत्या
बदलापूर पूर्व येथील स्टेशनपाडा परिसरात रविवारी रात्री संतोष दत्तात्रय साळवी (४०) यांची गोळी घालून हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र हरिश्चंद्र बागूल (३८) यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
बदलापूर पूर्व येथील जुना कात्रप रोड परिसरात राहणारा संतोष साळवी इस्टेट एजंट म्हणून काम करीत होता, तर बदलापूर पश्चिमेतील आनंदनगर, मांजर्ली भागात महेंद्र बागूल राहत होता. सहा महिन्यांपूर्वी आगरी युवक संघटनेचे पदाधिकारी शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून अंबरनाथ पोलिसांनी महेंद्रला अटक केली होती. त्या वेळी त्याच्याकडून तीन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दोन ते अडीच महिन्यांपूर्वी महेंद्रची जामिनावर सुटका झाली.
रविवारी रात्री बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्टेशनपाडा परिसरातील मोकळ्या जागेत संतोष, महेंद्र आणि त्यांचे इतर मित्र दारू पिण्यासाठी बसले होते. त्या वेळी संतोष आणि महेंद्रची बाचाबाची झाली. त्यातूनच महेंद्रने संतोषच्या पोटात गोळी घातली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

कल्याणात चोरीसाठी महिलेची हत्या
कल्याण पूर्व येथील चिंचपाडा भागातील लवंकुश सोसायटीमध्ये रविवारी रात्री पूनम गलराणी (४८) या महिलेचा धारदार शस्त्राचे वार करून व गळा आवळून खून करण्यात आला. घरातील ५० हजारांची रोख रक्कमही चोरटय़ाने चोरून नेली. त्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पूनम यांचे पती विजय रात्री घरी आले तेव्हा पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. पूनम यांच्याजवळ भरलेला गॅस सिलेंडर, चार्जरची वायर आढळून आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणासही अटक झालेली नाही.

पेटत्या होळीत अंडे फेकणाऱ्या तरुणास वासिंदमध्ये अटक
शहापूर येथील वासिंद भागात रविवारी रात्री भोईर यांच्या इमारतीसमोरील पेटत्या होळीमध्ये एका युवकाने कागदाच्या पुडीत बांधलेले अंडे फेकल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, या घटनेप्रकरणी वासिंद ग्रामपंचायत सदस्य सागर कंठे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करत इम्रान इब्राहीम शेख या तरुणास अटक केली.

महिला पत्रकाराचा विनयभंग, चौघे अटकेत
वृत्तवाहिनीमधील महिला पत्रकाराचा विनयभंग आणि कॅमेरामनला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी डी. एन. नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली. या प्रकरणी आणखी ३०-४० जणांचा पोलीस शोध घेत आहेत. होळीनिमित्त अंधेरी परिसरात छायाचित्रण करुन सदर महिला पत्रकार आणि कॅमेरामन आपल्या कार्यालयात परतत होते. त्यावेळी काही तरुणांनी रस्त्यात त्यांची गाडी अडविली. त्यामुळे महिला पत्रकार आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. काही तरुणांनी सदर पत्रकार महिलेचा विनयभंग केला आणि कॅमेरामनला मारहाण केली. या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लाचखोर वनाधिकाऱ्याला अटक
रक्तचंदन तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून वनाधिकाऱ्यांवर ५० लाखांची खंडणी मागण्याचा आणि बंदुकीतून गोळी झाडण्याचा असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी चौकशीअंती १४ वनाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांविरोधात उप वनसंरक्षक अधिकारी सुगंध लाड यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यातील ज्ञानेश्वर सोनबाबू चिखले या अधिकाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. उर्वरित अधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली.
४ महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये तस्करी करणारा एक ट्रक वन विभागाने पकडला. यामधून सुमारे १० टन रक्तचंदनाचा साठा जप्त करणात आला. या प्रकरणात राजेश पोखरकर याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने कारवाईच्या वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंदुकीतून गोळी झाडली, बंदुकीचा धाक दाखवला, मारहाण केली आणि ५० लाख रुपये घेतल्याची लेखी तक्रार वन विभागाकडे केली होती.

Story img Loader